कोरोना बाधीताच्या रिपोर्टमध्ये घोळ? : जिल्हा प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 07:17 PM2020-05-05T19:17:49+5:302020-05-05T19:17:59+5:30
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना दिले आहेत.
बुलडाणा: कामठी येथील कोरोना पॉझीटीव्ह निघालेल्या तीन धर्मप्रचारकांपैकी एका धर्मप्रचारकाच्या एकाच स्वॅब नमुन्याचे १६ तासांच्या फरकाने निगेटीव्ह व नंतर पॉझीटीव्ह अहवाल आल्याने निर्माण झालेला विरोधाभास पाहता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना दिले आहेत.
बुलडाणा शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील एका धार्मिक स्थळी राहणाºया कामठी येथील ११ धर्मप्रचारकांचे स्वॅब नमुने २५ एप्रिल रोजी घेण्यात आले होते. यातील तिघांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. मात्र यातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा अकोला लॅबमधून ७५५ क्रमांकाचा जावक क्रमांक असलेल्या स्वॅब नमुन्याचे दोन अहवाल १६ तासांच्या फरकाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास अनुक्रमे २६ आणि २७ एप्रिल रोजी प्राप्त झाले होते. एकाच व्यक्तीच्या एकाच स्वॅब नमुन्याचे एकाच जावक क्रमांकावर एकदा निगेटीव्ह व एकदा पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त झाल्यामुळे एकंदर या अहवालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या प्रश्नी आझाद हिंद संघटनेचे अॅड. सतिश् रोठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक निवेदन देवून प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र या प्रश्नी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. अखेर या प्रकरणी जवळपास आठ दिवसानंतर जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर तसा कार्यपुर्ती अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहेत.
तक्रार समितीने घेतली दखल
आझाद हिंद संघटनेने निवेदनाद्वारे केलेल्या या तक्रारीची दखल कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध तक्रार समितीने आठ दिवसानंतर घेतली. सोबतच प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांना अनुषंगीक चौकशीचे आदेश देत संबंधीत तक्रारकर्त्यांनाही परस्पर केलेल्या कार्यवाहीची माहिती कळविण्याबाबत सुचीत केले असल्याची माहिती या समितीच्या नोडल अधिकारी गौरी सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.