लसीकरणाच्या चुकीच्या संदेशामुळे गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:45+5:302021-05-16T04:33:45+5:30
सध्या सर्वत्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिक लसीकरणासाठी धाव घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रोज शेकडो नागरिक लसीसाठी सकाळीच उपस्थित ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिक लसीकरणासाठी धाव घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रोज शेकडो नागरिक लसीसाठी सकाळीच उपस्थित राहतात. १२ मे रोजीही कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक सकाळपासूनच जमले होते. मात्र काही नागरिकांना आधार कार्ड बघितल्यावर तुम्हाला कोव्हॅक्सिन लसचा पहिला डोस दिला होता, आज कोविशिल्ड लस आहे, तुम्ही परत जा, असे सांगण्यात आले. त्यानंतर लाभार्थ्यांनी आमच्या मोबाईलवर कोविशिल्ड पहिल्या डोसचा संदेश आलेला असल्याचे सांगितले. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांनी तुमची नोंद कोव्हॅक्सिन लसीची असल्याचे सांगितल्याने लाभार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. सॉफ्टवेअर अपडेट कामामुळे २३ ते २६ एप्रिलपर्यंत ज्यांनी लस घेतली त्यांना कोव्हॅक्सिन लस दिली. मात्र त्यांच्या मोबाईलवर कोविशिल्ड लसीचे संदेश गेले आहेत. ही बाब यंत्रणेच्या लक्षात आल्यावर त्यांनी संगणकात तशी नोंद घेतली. मात्र संबंधित नागरिकांना कळविले नाही. त्यामुळे नागरिकांचा असा गोंधळ उडाला.
खात्री करून दुसरा डोस घेण्याचे आवाहन
आता संबंधित नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाल्यावर खात्री करून दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. उद्या, सोमवारपर्यंत कोव्हॅक्सिन लस येईल असा अंदाज आहे. एकंदरीत रोज कोणत्या लसीचा डोस मिळणार याबाबत स्थानिक आरोग्य विभाग सोशल मीडियावर हवी तशी माहिती देत नसल्याने नागरिक त्रस्त होत आहेत.