परीक्षार्थ्यांचा गोंधळ
By admin | Published: April 20, 2015 10:42 PM2015-04-20T22:42:21+5:302015-04-20T22:42:21+5:30
बी.एड्.ची चुकीची प्रश्नपत्रिका दिली; विद्यापीठाचा भोंगळ कारभार.
बुलडाणा : विषयाचे नाव बरोबर लिहून चुकीचे प्रश्न लिहिलेली प्रश्नपत्रिका दिल्यामुळे बी.एड्. परीक्षार्थींनी येथील दोन परीक्षा केंद्रांवर २0 एप्रिल रोजी सकाळी दोन तास गोंधळ केला. ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही, त्या विषयाची प्रश्न पत्रिका दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत होता. दरम्यान, पोलिसांनी रोष व्यक्त करणार्या जमावाला शांत केले. यावेळी परीक्षार्थींनी काही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या गोंधळाची तक्रार प्राचार्य व परीक्षा केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून विद्यापीठाकडे पाठविली. बुलडाणा शहरातील जिजामाता महाविद्यालय व चिखली रस्त्यावरील कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान २0 एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान बी.एड्. परीक्षार्थींचा उदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, हा पहिला पेपर होता. विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहिला पेपरचा अभ्यास करून बी.एड्. परीक्षार्थी आ पल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. सकाळी ९ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्न पत्रिका वाटण्यात आल्या; मात्र प्रश्नपत्रिकेवर विषयाचे नाव बरोबर होते; मात्र विचारण्यात आलेले प्रश्न २३ एप्रिल रोजी होणार्या शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाचे होते. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला व विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. सदर परिस्थिती शहरातील जिजामाता महाविद्यालय व कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर निर्माण झाली होती.
*१३ महाविद्यालयातील १२00 विद्यार्थ्यांना फटका
बुलडाणा जिल्ह्यात १३ महाविद्यालये असून, त्यामधून १२00 विद्यार्थी बी.एड्च्या परीक्षेला बसले होते. आजच्या गोंधळामुळे या विद्यार्थ्यांना उदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, हा पहिला पेपर आता ७ मे नंतर पुन्हा द्यावा लागणार आहे तर मानसशास्त्राचा २३ एप्रिल रोजी होणारा पेपर अमरावती विद्यापीठाला पुन्हा सेट करावा लागणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वेळा पत्रकाऐवजी दुसराच पेपर हातात आल्यामुळे विद्यार्थ्यांंना सोमवारी सकाळी मनस् ताप सहन करावा लागला.