निमखेड लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:25+5:302021-07-15T04:24:25+5:30
देऊळगाव राजा : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचली हाेती़ यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला तसेच अनेकांना रुग्णालयात भरती ...
देऊळगाव राजा : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचली हाेती़ यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला तसेच अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले़ त्यामुळे, लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळत आहे़ तालुक्यातील निमखेड येथे टाेकन वाटपात गैरप्रकार हाेत असल्याचा आराेप करीत ग्रामस्थांनी १३ जुलै राेजी लसीकरण केंद्रावर गाेंधळ घातला हाेता़ आराेग्य विभागाने पाेलिसांना पाचारण केल्याने शांततेत लसीकरण पार पडले़
निमखेड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये १३ जुलै राेजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत लसीकरण शिबिर आयाेजित करण्यात आले हाेते़ या केंद्रावर एकूण १३० लसीचे डाेस उपलब्ध करून देण्यात आले हाेते़ यावेळी आराेग्य विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही़ नागरिकांना देण्यात येणारे टोकन वेळ नोंदणीकृत तारीख यामध्ये प्रचंड तफावत असल्याने नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे.
त्यातच सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी महिला व पुरुषांना वेळेचे भान ठेवूनच लसीकरणासाठी यावे लागते़ परंतु ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी हे आपल्याच माहितीतील नागरिकांना टोकन वाटप करत आहे व तोंड बघून टोकन देत आहेत़ त्यामुळे, रांगेत उभे असलेल्या नागरिकांना टाेकन मिळत नसल्याने गाेंधळ उडाला हाेता़ अनेक जण सकाळी आठ वाजल्यापासून रांगेमध्ये ताटकळत उभे होते व परिचितांना टोकन दिल्याने प्रचंड गोंधळ झाला़ त्यामुळे आराेग्य विभागाने पाेलिसांना पाचारण केले हाेते़ पाेलीस बंदाेबस्तात लसीकरण पार पडले़