लोणारमध्ये इको सेन्सेटिव्ह झोनबाबत संभ्रम; विकास कामे रखडली
By निलेश जोशी | Published: August 30, 2023 07:15 PM2023-08-30T19:15:48+5:302023-08-30T19:15:57+5:30
सरोवरालगतच्या १०० मीटर परिसरात उल्कापातामुळे झालेल्या या सरोवरातील मलबा अर्थात इजेक्टा ब्लँकेट पसरलेले आहे.
लोणार : उल्कापातातून निर्माण झालेल्या लोणार सरोवराभोवती आजही काही प्रमाणात तत्कालीन अवशेष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरोवरालगतचा काही अंतरापर्यंतचा परिसर हा अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. परंतु सरोवरापासून नेमके किती अंतर हे अतिसंवेदनशील क्षेत्र आहे, याचा उलगडा होत नसल्याने या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातून येथील विकासकामे रखडल्याची अेारड होत आहे.
स्थानिक नागरिक, पालिका प्रशासन, वन्यजीव, पर्यटन विभाग, महसूल विभागामध्येही याबाबत संभ्रम आहे. परिणामस्वरूप विकास आराखड्यातील प्रस्तावीत विकाकामे मार्गी लावण्याबाबत प्रशासकीय यंत्रणांमध्येच द्विधा मनस्थिती आहे. त्यामुळे निधी असूनही कामे रखडल्याचे वास्तव आहे.
सरोवरालगतचा १०० मीटर परिसर अतिसंवेदनशील
सरोवरालगतच्या १०० मीटर परिसरात उल्कापातामुळे झालेल्या या सरोवरातील मलबा अर्थात इजेक्टा ब्लँकेट पसरलेले आहे. संशोधनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वपूर्ण असल्याने सरोवराच्या सभोवती ३६० डिग्रीमधील १०० मीटरचा परिसर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, नुसार अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला आहे. मात्र हे करत असताना याची परिसीमा अजूनही निश्चित नसल्याची माहिती आहे. त्यातून गोंधळ उडत आहे. अनुषंंगिक सीमा निश्चित केल्यास संभ्रम दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. सरोवरालगतचे ३८३.२२ हेक्टर क्षेत्र वन्यजीव विभागाने अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तशी अधिसूचना २० नोव्हेंबर २०१५ रोजी काढण्यात आली होती. त्यामुळे या भागात खोदकाम, नवीन बांधकाम, वृक्षतोड, ध्वनीप्रदूषण करण्यासह प्लास्टिकवर बंदी आहे.
ही कामे पडली आहेत बंद
जुन्या तहसील इमारतीच्या ठिकाणी पर्यटन स्वागत केंद्र, धारतीर्थ ते सरदार वल्लभ पटेल हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याचे काम, पालिकेच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण ही कामे सध्या प्रामुख्याने रखडलेली आहेत. त्यामुळे येथील अतिसंवेदनशील क्षेत्राच्या सीमेसंदर्भातील संभ्रम इको सेंसेटिव्ह झोन समितीच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी दूर करतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.