बुलडाणा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या पदभरतीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:03 PM2021-03-01T12:03:41+5:302021-03-01T12:03:52+5:30
Buldhana Health Department आरोग्य विभागाच्या भरतीत अन्याय झाल्याची तक्रार काही उमेदवारांमधून करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये एमएसडब्लू धारक शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांवर कंत्राटी आरोग्य विभागाच्या भरतीत अन्याय झाल्याची तक्रार काही उमेदवारांमधून करण्यात येत आहे. त्यामुळे या पदभरतीत गोंधळ निर्माण झाला आहे. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी शैक्षणिक अर्हता असलेला उमेदवार न मिळाल्यामुळे या पदावर स्टे किंवा संपूर्ण एमएसडब्ल्यू पदवीधारक उमेदवार भरण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेमधून १२ जून २०२० ला आरोग्य विभागाच्या ३२ कंत्राटी रिक्त पदांच्या भरतीसाठी आवेदन मागितले होते. ही भरती पद क्रमांक सहा मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी एम.फिल. - पीएसडब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता मागितली होती. या पात्रतेचा उमेदवार न मिळाल्यास एमएसडब्ल्यू ही अर्हता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देऊ, असा कुठलाही उल्लेख जाहिरातीमध्ये केलेला नाही. त्यामुळे अनेक एमएसडब्ल्यू शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी या भरतीत आवेदन भरलेले नाही. प्रत्यक्ष उमेदवाराची निवड करताना मात्र एमएसडब्ल्यू पदविधारक उमेदवाराची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ ६४.६४ गुणांनी एमएसडब्ल्यू उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचीही निवड यामध्ये करण्यात आली. उमेदवाराचे वय २३ वर्ष पूर्ण लागत असतानाही संबंधित उमेदवाराचे वय २२ वर्ष १५ दिवस इतके होते. संबंधित उमेदवाराने पाच वर्षांचा अनुभवही दाखविलेला आहे. मग या उमेदवाराला आधीच्या कार्यालयाने संबंधित शैक्षणिक पात्रता नसताना किंवा वयाच्या १८ व्या वर्षीच नोकरी दिली का? असा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एमएसडब्ल्यू पदवीधारक पी. बी. तोडकर, प्रभाकर वाघमारे यांनी केली आहे. जि.प सीईअेासंह अन्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील पदभरती संदर्भातील गैरप्रकाराबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण जिल्हा शल्य चिकित्सकांकडे येत असल्याचे सांगितले, तर जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनही या पदभरतीबाबत माहिती मिळू शकली नाही.