रेती उत्खननाचा गोंधळ, मर्यादेपेक्षा जास्त उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:14+5:302021-07-30T04:36:14+5:30
खडकपूर्णा नदी देऊळगाव राजानंतर सिंदखेड राजा व लोणार तालुक्यातून जाते. त्यानंतर हीच नदी मंठा तालुक्यामधून खाली येलदरी धरणात जाते, ...
खडकपूर्णा नदी देऊळगाव राजानंतर सिंदखेड राजा व लोणार तालुक्यातून जाते. त्यानंतर हीच नदी मंठा तालुक्यामधून खाली येलदरी धरणात जाते, असा या नदीचा प्रवास आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील खडकपूर्णा नदीवर नारायणखेड, देऊळगाव राजा, साठेगाव, हिवरखेड, तढेगाव, सावरगाव तेली या घाटावर यावर्षी रेती उत्खनन चालू होते. ठेकेदारांनी शक्कल लढवून एका पावतीवर ३०० रुपये देऊन ॲडजस्टमेंट करून रेतीचे उत्खनन केले आहे. काही ठिकाणी अवैध पावती पुस्तकाचा वापर सुद्धा केला आहे. तसेच ठेकेदाराला उत्खनन करण्यात अडचणी आल्याचे दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेतीचा स्टाॅक करण्याकरिता परवानगी देण्यात आली, याबाबत माहिती सिंदखेड राजा तालुक्यातील रेतीघाट यावरून हजारो टिप्पर रेती ही समृद्धी महामार्गावर टाकण्यात आली. त्याचे मोजमाप दिसून येत नाही. त्यांना दिलेल्या पावत्या सुद्धा कमी झाल्याचे दिसत नाही. काही घाटावर जेवढ्या पावत्या देण्यात आल्या, त्या तारखेमध्ये तेवढा स्टॉक ठेकेदाराने केलेला होता. मग याच घाटावरून रेती विक्री झाली नाही काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्येक घाटाच्या मालकांनी शासनाने दिलेल्या परवानगी एवढा रेतीचा स्टॉक आज केलेला आहे. मग घाटावरून रेती विक्री झाली किंवा नाही हा मुद्दा उपस्थित होत आहे.
शासनाचा महसूल बुडतोय
खोट्या पावत्या तयार करून गौण खनिजाची विक्री करण्यात आल्याचे अनेक प्रकार यापूर्वी सुद्धा समोर आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देऊनसुद्धा कारवाई होत नाही. संबंधित ठेकेदाराची स्ट्रोक ही हजारो ब्रासमध्ये जागोजागी परस्पर दुसऱ्याच्या नावावर टाकलेली आहेत. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी, परंतु होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.