कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात जमावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:03 AM2021-02-18T05:03:57+5:302021-02-18T05:03:57+5:30
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढला असून बुधवारीही १९९ जण कोरोेना बाधित आढळून आले आहेत. परिणामी, ही ...
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढला असून बुधवारीही १९९ जण कोरोेना बाधित आढळून आले आहेत. परिणामी, ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सोबतच धार्मिक सण, उत्सवांवरही बंधने लादण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त मिरवणूक, रॅली काढण्यासही पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवजयंतीच्या मिरवणुका व रॅलींवरही आता निर्बंध आले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांनी साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना प्राप्त अधिकारांतर्गत हा आदेश काढण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही दुपारी ४ नंतर बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. शहरी तथा ग्रामीण भागातही या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार असून पालिका मुख्याधिकारी व तालुका दंडाधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनानेही यंत्रणेला त्या अनुषंगाने सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. एकंदरीत शहरी तथा ग्रामीण भागातही पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येऊ नये, असे या आदेशाने स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, जिल्ह्यात पोलीस व पालिका प्रशासनाकडून अनुषंगिक निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
--धार्मिक यात्रा, उत्सवांवरही निर्बंध--
जिल्ह्यात धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभांवर निर्बंध लादण्यात आले असून, अशा कार्यक्रमांसाठी केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची मुभा राहणार आहे. याव्यतिरिक्त मिरवणुका, रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत यासंदर्भाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लग्न समारंभासाठीही ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल.
--शैक्षणिक संस्थाही बंद--
सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद करण्याच्या सूचना आहेत. ५वी ते ९वीचे वर्ग, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल्स, दुकानांच्या पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही, याची योग्य व्यवस्था संबंधितांनी करावी तथा मास्क सर्वांना अनिवार्य करण्यात आला आहे.
--दुपारी ४ नंतर आठवडी बाजार बंद--
जिलह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी ४ नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही याची पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी दक्षता घेण्यासोबतच गर्दी प्रतिबंधासाठी पथके नियुक्त करून आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.