केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरुद्ध आजपासून काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:14+5:302021-07-09T04:23:14+5:30
जिल्ह्यात ८ ते १७ जुलै दरम्यान हे आंदोलन अभियान राबविण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी ...
जिल्ह्यात ८ ते १७ जुलै दरम्यान हे आंदोलन अभियान राबविण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या आंदोलन सप्ताहादरम्यान ९ जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने महागाईविरोधात सर्व जिल्हा मुख्यालय ठिकाणी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे. १० जुलै रोजी सर्व शहर व जिल्हा पातळीवर सायकल यात्रा काढून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध, ११ ते १५ जुलैदरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, इंटक, सर्व डिपार्टमेंट व सेल यांनी राज्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये जिथे तिथे पेट्रोलपंप आहेत, तेथे जाऊन इंधन दरवाढीविरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवावी, या मोहिमेत जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या विविध आंदोलनादरम्यान महागाईविरोधात तीव्र आंदोलन करून केंद्रातील भाजपा सरकारला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडून सामान्य लोकांना दिलासा मिळावा, याकरिता काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या या जनआंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
सायकल यात्राही निघणार
१२ व १३ जुलै रोजी प्रत्येक ब्लॉक पातळीवर पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमतीविरोधात किमान ५ किमी सायकल यात्रा काढून पेट्रोल पंपाजवळ विसर्जित करण्यात येणार आहे. १२ ते १५ जुलै दरम्यान महिला काँग्रेसच्यावतीने प्रत्येक ब्लॉकपातळीवर एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईविरोधात आंदोलन होणार आहे. १६ जुलै रोजी राज्य पातळीवर मुंबई येथे महागाईविरोधात सायकल यात्रा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.