काँग्रेसच्या हाती निलंबनाचे हत्यार
By admin | Published: November 17, 2014 12:49 AM2014-11-17T00:49:40+5:302014-11-17T00:49:40+5:30
सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे.
राजेश शेगोकार / बुलडाणा
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने बुलडाण्यातील आपली संख्या कायम ठेवली असली तरी सत्ता गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षामध्येही मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे असतानाच पहिल्याच अधिवेशनात निलंबित झालेल्या पाच आमदारांमध्ये चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचा बळी गेला. विश्वासमत प्रस्तावाविरोधातील काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी हे निलंबन केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असला तरी आता याच निलंबनाचा हत्यार म्हणून वापर करीत काँग्रेस पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला पराभवानंतर लोकांमध्ये जायचे असेल, तर प्रभावी मुद्दा लागतो तो मुद्दा या निलंबनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या हाती लागल्याने येणार्या काळात बुलडाण्यातील काँग्रेसही राहुल मय होईल, हे स्पष्टच होत आहे.
निलंबनाबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची आगामी भूमिका मांडली यावेळी निलंबित आमदार राहुल बोंद्रे व प्रत्यक्षदश्री आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. आपली बाजू मांडत असताना सरकारच्या भूमिकेचा परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील विरोधाभासी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले व या प्रकरणातील एकूणच भूमिका मांडताना सरकारने जाणीवपूर्वक हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे या प्रकरणातील राजकारण आता राज्यस्तरावर रंगणार असून, त्याचे पडसाद जिल्हास्तवरही पडतील. येणार्या हिवाळी अधिवेशनापर्यंत हा मुद्दा ताणून धरला जाईल. या निमित्ताने भाजपाने राष्ट्रवादीचा घेतलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, सेनेची सत्तेत सहभाग घेण्यासाठी होत असलेली ससेहोलपट या मुद्यांवर काँग्रेसला या दोन्ही पक्षांना सहज टार्गेट करता येणे शक्य आहे, या मुद्यावर भाजपा बचावात्मक पवित्र्यात आहे त्यामुळे भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेसला आधी एकसंघ होण्याची गरज आहे.
या पृष्ठभूमीवर राहुल बोंद्रे यांचे निलंबन हेच हत्यार म्हणून काँग्रेसने हातात घेतले असल्याने मरगळलेल्या पक्षामध्ये काही प्रमाणात चेतना येईल व विरोधकांवरही राजकीय वार करता येईल. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस याचा प्रभावी वापर कसा करते, यावरही काँग्रेसची दिशा अवलंबून आहे.
*स्वाभिमानी पुन्हा सोयाबीन आंदोलनात
भाजपाच्या सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चार गडी राखत मनातल्या मनात शरद पवारांचे नाव घेऊन विश्वासमत प्रस्ताव जिंकला. या चार गड्यांमध्ये मेटे, आठवले, जानकरांसोबतच शेट्टी यांचाही समावेश आहे. याच स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे खंदे सर्मथक पहिल्या फळीचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा मूळ भूमिकेत येत सोयाबीन व कापूस प्रश्नावर हात घालून आंदोलनाची हाक दिली.
*मनसे नव्या विठोबाच्या शोधात
मनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद सदस्य बुलडाण्याने विनोद वाघ यांच्या रूपाने दिला. वाघ यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसेला चर्चेत ठेवले; मात्र त्यांच्या आंदोलनात मुख्य टार्गेट हे राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे कायमच राहिले. वाघ यांच्या विरोधाने शिंगणे यांच्या मार्गात काहीही अडकाठी आली नाही. यावेळी मात्र निवडणुकीच्या मार्गावर शिंगणे नव्हतेच तरीही वाघ यांना पराभव पाहावा लागला.