काँग्रेस शासनाने मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये : दिलीपकुमार सानंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 12:55 AM2017-07-14T00:55:04+5:302017-07-14T00:55:04+5:30
भाऊसाहेब फुंडकर, आकाश फुंडकरांवर सानंदांचा शाब्दीक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कामाचे पुन्हा भूमिपूजन करून ना. पांडुरंग फुंडकर व आ. आकाश फुंडकर श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. ही बाब योग्य नसून, जुन्या कामांचे पुन्हा भूमिपूजन करण्याऐवजी नवीन विकास कामे मंजूर करून आणावी व त्याचे खुशाल श्रेय घ्यावे, केवळ श्रेयासाठी लोकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले, की आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात किडनी रुग्णांकरिता डायलिसीस युनिटचे बांधकाम करणे या कामाला निधी मंजूर करून आणला होता. या कामाला प्रशासकीय मान्यता ३१ मार्च २०१३ मध्ये मिळाली होती. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी १६ जानेवारी २०१४ रोजी या कामाला तांत्रिक मान्यता दिली व २२ एप्रिल रोजी संबंधित कंत्राटदाराला हे काम सुरू करण्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.
सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या बाजूला असलेल्या एका हॉलमध्ये डायलिसीसच्या चार युनिटचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभही करण्यात आला होता. डायलिसीसची ही सेवा अखंडपणे सुरू आहे. या कामाबाबत माहिती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काढलेल्या ‘संकल्पसिद्धी’ या पुस्तिकेमध्ये डायलिसीसच्या बांधण्यात येणाऱ्या संभाव्य इमारतीच्या फोटोसह प्रकाशित करण्यात आलेली आहे; परंतु राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरदेखील पालकमंत्री व आमदार डायलिसीस युनिटच्या उर्वरित कामासाठी निधी आणू शकले नाही.
सामान्य रुग्णालयाला भव्य आकर्षक प्रवेशद्वार व संरक्षण भिंत तसेच सपाटीकरणाच्या कामालाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेली होती. या कामाला कार्यारंभ आदेश २९ नोव्हेंबर २०१६ रोजी दिला होता. सपाटीकरण व इतर काम सुरू होऊन अनेक महिन्यांचा कालावधीदेखील उलटला आहे. तरीदेखील अगोदरच सुरू झालेल्या या कामाचे भूमिपूजन करून नागरिकांची दिशाभूल केली असल्याचेही सानंदा यांनी म्हटले आहे.