काँग्रेसचा गड ढासळला!
By admin | Published: February 24, 2017 02:17 AM2017-02-24T02:17:57+5:302017-02-24T02:17:57+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपा सर्वात मोठा पक्ष
बुलडाणा, दि. २३- जिल्हा परिषदेच्या ५५ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच भाजपा सर्वाधिक २४ जागांवर मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १0 जागा मिळून जिल्हा परिषदेवर भाजपा-शिवसेना युतीचा झेंडा फडकविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ता टिकवून ठेवण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्यामुळे नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागात मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विकासाची वाहिनी म्हणून ओळखली जाते. ६0 सदस्य संख्या असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून ५५ वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. मात्र, यावेळी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपाने नेत्रदीपक यश मिळवून २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. शिवसेनेने १0 जागा जिंकून लक्षवेधी यश मिळविले आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठय़ा प्रमाणात पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला १४, तर राष्ट्रवादीला आठ जागांवर विजय मिळवून समाधान मानावे लागले. याशिवाय भारिपने व अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळविला आहे. स्वाभिमानी पक्षाला खातेही उघडता आले नाही.
बुलडाणा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटासाठी ४१ उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यासाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट गटातून राष्ट्रवादीचे डी.एस. लहाने यांनी काँग्रेसचे कौतिकराव जाधव यांचा पराभव केला. मासरूळ गटातून शिवसेनेचे कमल बुधवत यांनी काँग्रेसच्या शकुंतला लांडे यांचा पराभव केला, तर सावळा-सुंदरखेड गटातून सविता बाहेकर यांनी भारिपचे सुरेश सिनकर यांचा पराभव केला. साखळी बु. गटातून काँग्रेसच्या जयश्री शेळके यांनी भाजपाच्या सुरेश चौधरी यांचा, तर धाड गटातून काँग्रेसच्या सौदागर हिना महम्मद रिजवान यांनी राष्ट्रवादीच्या मंगलाताई भोंडे यांचा पराभव केला. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीने प्रतिष्ठा केली होती. मात्र त्यांना यश आले नाही. तर रायपूर गटामध्ये काँग्रेसच्या साधना जाधव यांनी भाजपाच्या नंदा तरमळे यांचा पराभव करून विजय मिळविला.
याशिवाय घाटाखालील तालुक्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या सर्कलमध्ये खा.प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांचा भाजपाचे संजय वडतकर यांनी पराभव केला. डोणगाव जि.प. सर्कलमध्ये माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव शैलेश सावजी यांचा शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पळसकर यांनी पराभव केला. लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू गुलाब इंगळे यांनी भाजपचे अभय चव्हाण यांचा पराभव केला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगावमही जि.प. सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे रियाजखान पठाण विजयी झाले. त्यांनी भाजपाचे भगवान मुंडे व काँग्रेसचे प्रदीप नागरे यांचा पराभव केला. सावखेड भोई जि.प. सर्कलमध्ये काँग्रेसचे देवानंद कायंदे यांनी राष्ट्रवादीचे डॉ. रामप्रसाद रंगनाथ शेळके यांचा पराभव केला