काँग्रेसचा जिल्हाभर ‘रास्ता रोको’

By admin | Published: May 20, 2017 12:40 AM2017-05-20T00:40:31+5:302017-05-20T00:40:31+5:30

आ. बोंद्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरूच; आज बुलडाणा बंदची हाक

Congress's district 'Path Roko' | काँग्रेसचा जिल्हाभर ‘रास्ता रोको’

काँग्रेसचा जिल्हाभर ‘रास्ता रोको’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात १८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. या उपोषणाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १९ मे रोजी जिल्हाभर ‘रास्ता रोको’ केला.
जिल्ह्यात शासकीय यंत्रणेद्वारे सुरू असलेली तूर खरेदी शासनाच्या धरसोड धोरण व शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळकाढू व उदासीन धोरणामुळे रखडली असून, तूर उत्पादक शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारी व प्रचंड त्रासदायक ठरली आहे़ संथ गतीने तुरीचे मोजमाप व बारदाण्याचा अभाव, मोजणीसाठी काट्याचा अभाव, अधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती, खरेदीसाठी हेतुपुरस्सर केली जाणारी दिरंगाई आणि खरेदी झालेल्या तुरीचे पैसे देण्यास होणारा अक्षम्य विलंब, यामुळे शेतकरी बेजार झालेले आहेत़ ३१ मे पर्यंतची मुदतवाढ दिली असली, तरी आजवर २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आणलेल्या तुरीचेही मोजमाप झालेले नाही, तर महिना उलटूनही १० एप्रिलपर्यंत खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत, अशी स्थिती आहे़ तरी चुकारे त्वरित मिळावेत आणि आलेला खरीप हंगाम पाहता खरेदी करावयाच्या तुरीचे आगाऊ चुकारे देण्यात यावेत, या मागणीसाठी १८ मे पासून बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. यावेळी आंदोलनात तुकाराम बिरकड, बुलडाणा अर्बनचे डॉ.सुकेश झंवर, सुरेश सोनुने, श्याम उमाळकर, बाबूराव पाटील, दिलीपकुमार सानंदा, विजय अंभोरे, प्रा.नरेंद्र खेडेकर, नगराध्यक्ष हरीश रावल, संजय राठोड, जि.प.सदस्य जयश्री शेळके, लक्ष्मणराव घुमरे, डॉ़ रवींद्र कोलते, दीपक देशमाने, माणिकराव जाधव, समाधान हेलोडे, नंदकिशोर बोरे, प्रकाश धुमाळ, अ‍ॅड.शरद राखोंडे, राजू काटीकर, संजय पांढरे, रिजवान सौदागर, अत्तरोद्यीन काझी, रामदास मोरे, प्रमिला गवई, उषा चाटे, मीनल आंबेकर, देवानंद पवार, चित्रांगण खंडारे, प्रा.संतोष आंबेकर आदींनी पाठिंबा दिला, तर तहसीलदार सुरेश बगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांनी उपोषण मंडपाला भेटी दिल्या.

मनोज कायंदे यांची भेट
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कायंदे यांचा विवाह रविवारी होत असून, त्यांचा हळदीचा कार्यक्रम १८ मे रोजी देऊळगाव राजा येथे कौटुंबिक उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी हळदीच्या कार्यक्रमानंतर भोजनाच्या कार्यक्रमास न थांबता बुलडाण्यातील काँग्रेसच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोणालाही न सांगता बुलडाण्याला निघाले व आंदोलनात सहभागी झाले.

मुख्य सचिवांची आ.राहुल बोंद्रेंशी चर्चा
शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी तहसीलदार सुरेश बगळे, तहसीलदार सुनील शेळके, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी उपोषण मंडपास भेट देऊन शासनाची भूमिका मांडली़ त्यात २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर नोंदविल्या गेलेली तूर खरेदी शुक्रवारीच संपुष्ठात येईल व तूर खरेदीचा वेग वाढविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. मोताळा खरेदी केंद्र पुन्हा सुरू केल्याची माहिती दिली़; परंतु यावर आ.बोंद्रे यांनी समाधानी नसल्याचे सांगितल्यावर परत गेलेल्या प्रतिनिधी मंडळाने ही माहिती जिल्हाधिकारी यांना दिल्यावर जिल्हाधिकारी डॉ़ पुलकुंडवार व राज्याचे मुख्य सचिव सुमित मलीक यांनी आ.बोंद्रेंशी संपर्क केला़ मुख्य सचिवांनी ९ मेपर्यंत झालेल्या शासकीय खरेदीचे चुकारे येत्या दोन दिवसात देण्याबरोबर तूर खरेदीचा वेग वाढवून दिवसाला १० हजार पोते खरेदी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे आश्वासन दिले़

त्रिशरण चौकात ‘रास्ता रोको’
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांनी केलेल्या आवाहनानुुसार, येथील बुलडाणा-चिखली रस्त्यावरील त्रिशरण चौकात तालुकाध्यक्ष सुनील तायडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रिझवान सौदागर, सरपंच आरिफ, गजनफरखान, नरोटे, अमोल तायडे, दत्ता काकस, जाकीर कुरेशी, योगेश परसे, इरफान कुरेशी, सजुभाई अन्सारी, विनोद बेंडवाल, अमिन टेलर, रियाज ठेकेदार, सुरेश ठेकेदार, माणिकराव जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Congress's district 'Path Roko'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.