पक्ष्यांचे संवर्धन काळाची गरज - विजयश्री हेमके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 16:52 IST2020-11-08T13:43:28+5:302020-11-08T16:52:24+5:30
Conservition of birds पक्षांचे संवर्धन काळाची गरज आहे.

पक्ष्यांचे संवर्धन काळाची गरज - विजयश्री हेमके
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सध्या ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा सप्ताह सर्व महाराष्ट्रात पक्षीसप्ताह सध्या सुरू आहे. पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी अभ्यासक तथा शिवाजी महाविद्यालय चिखलीच्या प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विजयश्री हेमके यांच्याशी साधलेला संवाद.
महाराष्ट्रात पक्ष्यांच्या किती प्रजाती आहेत?
संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष्यांच्या ८५० प्रजाती सापडतात. पक्षीगट हा अतिशय वैविध्यपूर्ण आहे. यामध्ये ५ सेमीच्या हमिंगबर्ड ते ९ फुट असणारा शहामृग, उंच उडनाऱ्या घारी, गरुडापासून उडता न येणाऱ्या किवी, पेंग्विन पर्यंत तसेच सूर्योदय होताच बांग देणाऱ्या कोंबड्या पासून ते निशाचर घुबडांचा समावेश यामध्ये होतो. पक्षी जगत हे अतिशय विस्तृत आहे.
पक्ष्यांचे जीवसृष्टीतील महत्व काय आहे ?
चिमणीपासून ते कावळ्यापर्यंत सर्व पक्षांचे जीवसृष्टीत महत्त्व आहे. मान्सूनची सुचना देत “पेर्तेव्हा” म्हणणारा पावश्या पक्षी, तसेच सौंदर्याचे प्रतिक ठरलेला, अप्रतिम नृत्य करणारा मयुर, आपल्या बोलण्याची नक्कल करणारा राघू, नांगरणी करताना थव्याने आढळणारे पांढरेशुभ्र बगळे तसेच खाद्यांनाचा दर्जा लाभलेले काही पक्षी, यांनी आपले आयुष्य भरून गेलेले आहे.
पक्ष्यांविषयी काय सांगाल ?
खाद्य मिळवण्याच्या हालचालींना अनुरुप अशी पक्ष्यांच्या पंखांची रचना असते. पंखांमुळे पक्षांना आकाशात झेपावता येते. आपल्या आकारा आणि प्रकारानुसार पक्ष्यांची उडण्याची क्षमता ठरते. ऊतुंग आकाशात विहरण्याच्या या शक्तीमुळे पक्षी हे इतर सर्व प्राण्यांपेक्षा आगळेवेगळे आणि विलक्षण ठरतात. मोर, बदक, भारद्वाज सारखे पक्षी कमी उंचीवर उडतात तर गरुडासारखे पक्षी अगदी उंचावर झेपावतात. घार एकाच ठिकाणी पंख न हलविता तरंगते.
पक्ष्यांच्या जाती दुर्मीळ हाेत आहेत का ?
प्रदुषण, किटकनाशक, शिकारी, आधुनिकीकरण, अधिवास अतिक्रमण यामुळे अनेक प्रजाती वेगाने नष्ट होत आहेत. विदर्भातील गवताळ प्रदेशात आढळणारा तनमाेर हा पक्षी गत काही वर्षांपासून दुर्मीळ झाला आहे.
पक्षी संवर्धनासाठी काय करायला हवे ?
जखमी पक्ष्यांना उपचार देऊन निसर्गात योग्य ठिकाणी परत सोडणे, उन्हाळ्यात त्यांच्यासाठी पाणी ठेवणे, जलाशयात प्लास्टीक प्रदुषण होऊ न देणे. चिमण्यासारख्या पक्षांसाठी कृत्रिम घरटे तयार करणे असे अनेकानेक उपक्रम हाती घेवून आपण पक्ष्यांचे संवर्धन करू शकताे.