दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन प्रत्येकाचेच दायित्व - धनंजय मिसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 08:19 PM2020-09-05T20:19:05+5:302020-09-05T20:19:17+5:30
पर्यावरण रक्षक आणि राज्यातील पहिल्या ‘पॉकीट’ बीज बँकेचे प्रणेते धनंजय मिसाळ यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
निसर्ग आल्हाददायी आणि जीवनदायी आहे. मात्र, मनुष्य स्वस्वार्थासाठी त्याची अपरिमित हानी करीत आहे. निसर्गाच्या ºहासामुळे मनुष्यासमोर अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे वेळीच सावध होऊन निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने सजग व्हावे. दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनाचा वसा जोपासणारे... पर्यावरण रक्षक आणि राज्यातील पहिल्या ‘पॉकीट’ बीज बँकेचे प्रणेते धनंजय मिसाळ यांच्याशी साधलेला संवाद...
दुर्मिळ वनस्पतीचे कंद आणि बियां किती जणांना वितरीत केल्यात?
फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात येणाºयांना तसेच पोस्टाने दोन पाकीटं पाठविणाºया जवळपास दोन हजारावर नागरिकांना विविध देशी वृक्ष-वेलींच्या बिया पोस्टाने पाठविल्या आहेत. जंगल भ्रंमती केल्यानंतर सापडलेल्या कोणत्याही झाडा-वनस्पतीच्या बिया संकलित करणे व इच्छुकांना पोस्टाद्वारे पाठवणे हा आता आपला छंद झाला आहे.
आतापर्यंत प्रामुख्याने आपण कोठे-कोठे दुर्मिळ वनस्पतींच्या बिया दिल्या ?
नोकरी सांभाळून जंगलात सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतींच्या बिया, कंदमुळे संकलित केल्यानंतर फेसबूकवरील मित्रांना माहिती दिली जाते. देशभरात मोठी मित्रसंख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपºयासहीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगाना, राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यातील मित्रांना पोस्टाने बियां, कंदमुळं पाठविली आहेत.
पॉकिट बीज बँकेच्या यशात आपणास सहकार्य कुणाचे?
निश्चितच पर्यावरण प्रेमी मित्रांच्या सहकार्यामुळे चार हजारावर वनस्पतींच्या बियां आणि कंदमुळांची बीज बॅक कार्यान्वित झाली. त्यामुळे पहिले श्रेय पर्यावरणप्रेमी मित्रांचे असले तरी, मला घडविण्यात माझा लहान भाऊ संजय मिसाळ याचा मोलाचा वाटा आहे. त्याची मदत झाली नसती तर, कदाचित मी याक्षेत्रात आणि काहीच नसतो. पत्नी अनिता आणि मुलगा गितेश हा देखील या कार्यात मदत करतो.
दुर्मिळ वनस्पती संकलन, संवर्धनाची प्रेरणा कोठून मिळाली?
बालपणापासून निसर्गाची मनाला ओढ आहे. मात्र, निसर्गाशी ‘नाळ’ जोडल्या गेली, ती बाबांच्या मामी आणि माझ्या आजी शेवंताबाई वाळके रा. अकोली जहांगीर यांच्यामुळेच. थोडक्यात आजीबाईच्या ‘निसर्ग’प्रेमामुळेच मी लहानपासून निसर्गाशी समरूप झालो. आजी शेतात रानभाज्या आणि नैसर्गिक वनस्पती लावत असे. उन्हाळ्यात बियांचे संकलन करीत असे, आजीची ‘हिरवाई’ची कृती बालमनावर घट्ट कोरल्या गेली. आजी हीच आपला पहिला निसर्ग गुरू आहे. पुढे निसर्ग आणि समाजातील जुन्या जाणत्यांनी माझी निसर्ग चळवळ प्रगल्भ केली. पर्यावरण प्रेमी मित्रांनी या चळवळीला उभारी दिली. वडिलांचेही मोठं योगदान या उपक्रमात आहे.
लोप पावत चाललेली दुर्मिळ वनस्पती माझ्या परसबागेतच नव्हे तर जमिनीवर कुठेतरी जीवंत रहावी. हेच आपलं अंतिम ध्येय आहे. गत काही वर्षांत निसर्गाबद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे. ही आनंददायी बाब असली तरी, निसर्ग संवर्धन ही ‘लोक’चळवळ होणे गरजेचे आहे.