दिलासा : बुलडाण्यात सात दिवसात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:30 AM2020-05-04T10:30:55+5:302020-05-04T10:31:01+5:30
आठवड्यापासून बुलडाणा जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे बुलडाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या एक आठवड्यापासून बुलडाणा जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे बुलडाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त होण्याची शक्यता असून प्रसंगी पाच मे रोजी त्याला सुटी दिली जाण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे.
बुलडाणा शहरात कामठी येथील ११ पैकी तीन प्रचारक हे २७ एप्रिल रोजी पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. १३ एप्रिल पासून जिल्ह्यात एकही रुग्ण पाझीटीव्ह नसतांना अचानक तिघे पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणा आणखी अलर्टवर आल्या होत्या.
कामठीमधून बुलडाणा जिल्ह्यात धर्मप्रचारक म्हणून आलेल्यांपैकी तिघे पॉझीटीव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती आणि यापूर्वी क्वारंटीन करण्यात आलेलेल्या सर्वच धर्मप्रचारकांची पुन्हा नव्याने कोरोना तपासणी करण्याचे पत्रच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने आरोग्य यंत्रणेला दिले होते. त्यानुषंगाने आतापर्यंत जवळपास ४० पेक्षा अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून पोलिस दलातील ३८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. पैकी २७ पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर अन्य संदिग्धांचीही सातत्याने तपासणी करण्यात येत असून गेल्या सात दिवसात तब्बल १६३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत.
ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, तीन मे रोजी सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ५०२ व्यक्तींचे अहवाल हे नगेटीव्ह आले आहेत. दुसरीकडे चार मे पासून बुलडाणा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये जाणार आहे. त्यामुळे काही नियमांमध्ये शिथीलता मिळण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात एकूण चार रुग्णांवर उपचार करण्यात येत असून यातील तीन बुलडाण्याचे तर एक चिखली येथील असल्याचे सुत्रांनी सांगितले.