आयुष विभागाचे बांधकाम अनधिकृत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:57 PM2020-03-13T13:57:20+5:302020-03-13T13:57:27+5:30
हे बांधकाम त्वरीत थांबविण्यासाठी वरिष्ठांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपअभियंत्यांना पत्र दिले आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रूग्णालयाच्या इमारतीवर आयुष विभागाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, आयुष इमारती करीता निवडलेली जागा चुकीची असल्याचा ठपका ठेवत, वैद्यकीय अधिक्षकांनी हे बांधकाम त्वरीत थांबविण्यासाठी वरिष्ठांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपअभियंत्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे पहिल्या माळ्यावर आयुष अंतर्गत इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात आयुष इमारतीकरीता सामान्य रुग्णालय प्रशासनाने दाखविलेल्या जागेऐवजी रूग्णालयीन वाढीव वार्डाकरीता आरक्षीत जागेवर म्हणजेच सामान्य रूग्णालयाच्या छतावर बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वार्ड बांधण्याकरीता जागा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम करण्यात येत असलेल्या जागेची निवड करताना कोणालाही विचारात घेण्यात आले नसल्याचा ठपका वैद्यकीय अधिक्षकांनी ठेवला आहे. दरम्यान, सामान्य रूग्णालय प्रशासनाला चालू असलेल्या बांधकाम नकाशाची प्रतही देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेगाव येथील सामान्य रूग्णालयाच्या इमारतीवर सुरू असलेले बांधकाम अनधिकृत असल्याची बाब अधोरेखीत होत आहे. या पत्राच्या प्रतिलिपी जिल्हा शल्य चिकित्सकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा, उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.
सुरू असलेले बांधकाम क्षेत्रफळापेक्षा कमी!
सामन्य रूग्णालयाच्या इमारतीवर सुरू असलेले बांधकाम क्षेत्रफळापेक्षा कमी असल्याचेही वैद्यकी अधिक्षकांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. शिवाय जागा निवडीबाबत संबंधितांना विचारणा केली असता अभियंता नाईक यांनी अरेरावी केल्याचेही नमूद केले आहे.
रूग्णालयाच्या वीज आणि पाण्याचा वापर!
बांधकाम सुरू असताना रूग्णालय प्रशासन अनभिज्ञ आहे. मात्र, बांधकामासाठी रूग्णालयाची वीज, पाणी वापरण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. या पत्रामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
सईबाई मोटे सामान्य रूग्णालय, शेगाव येथील इमारतीवरील बांधकाम थांबविण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. वैद्यकीय अधिक्षकांच्या पत्र प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल.
- प्रेमचंद पंडित
जिल्हा शल्य चिकित्सक
बुलडाणा.