पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनवर नाली बांधकाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:01 PM2018-12-30T12:01:14+5:302018-12-30T12:02:12+5:30
- अनिल गवई खामगाव : राष्ट्रीय मार्गाचे रूंदीकरण करताना पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच, नाल्याचे बांधकाम करण्यात येत असल्याची ...
- अनिल गवई
खामगाव: राष्ट्रीय मार्गाचे रूंदीकरण करताना पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच, नाल्याचे बांधकाम करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाईप लाईन स्थलांतरण करण्यापूर्वी नाल्या बांधकामास स्थगिती देण्यासाठी पालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र दिले आहे. पालिकेच्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली असून, काम थांबविण्याशिवाय कंत्राटदारासमोर कोणताच पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामास काही दिवसांपूर्वी सुरूवात करण्यात आली. मात्र, बाळापूर नाका ते विकमसी चौक आणि विकमसी चौक ते टिळकपुतळा पर्यतचे रस्ता काम करताना, सेंटर लाईन सोडून या रस्त्याची संरचना करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच आठवड्यात उघडकीस आला. परिणामी, सामान्यांसह या रस्त्यावरील कायदेशीर गाळे धारक व्यावसायिक आणि शासकीय कार्यालयेही वेठीस धरल्या गेल्याचा प्रकार ताजा असतानाच, कंत्राटदाराकडून नगर पालिका प्रशासनालाही अडचणीत आणण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी उघडकीस आली. पाईपलाईन स्थलांतरीत न करताच कंत्राटदाराकडून रस्त्याच्या रूंदीकरणास सुरूवात करण्यात आल्याने, आता शासकीय कार्यालयांनाही विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तथापि, या रस्त्याची संरचना ठिकठिकाणी बदलण्यात येत आहे. काही ठिकाणी चक्क अतिक्रमकांना लाभ पोहोचविण्यासाठी संरचना बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला. लागलीच पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थंलातरीत न करता नाल्याचे बांधकाम करण्यात येत असल्याने, कंत्राटदाराच्या भूमिकेबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकणाच्या प्रकल्प संचालकांशी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची प्रतिलिपी जिल्हाधिकाºयांनाही सादर करण्यात आली आहे.
शहराचा पाणी पुरवठा प्रभावित!
पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच नाल्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले. तर काही ठिकाणी नाल्यांची निर्मिती करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी रात्री खोदकाम करताना पाईपलाईन फोडण्यात आली. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर शनिवारी खामगाव शहरातील बाळापूर फैल, चांदमारी, रेखा प्लॉट भागातील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.
पालिकेचा कंत्राटदारावर मुजोरीचा ठपका!
पालिकेची पाईपलाईन स्थलांतरीत करण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. पालिकेने सादर केलेल्या अंदाजपत्रकास केवळ २० टक्के पाईप पूर्ण खरेदी करण्याचे सुचविले आहे. अशा मनमानी पध्दतीने काम केल्यास, पालिकेचे पाईप नाल्या, रस्त्यांखाली दबल्यास, पाईप पुरविण्याची बाब बाढू शकते. त्यामुळे आधी पाईपलाईनचे स्थलांतरण आणि नंतर रस्त्याचे काम करण्याचे करण्याचे पालिकेने प्रकल्प व्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, अमरावती यांना २८ डिसेंबर रोजी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच वारंवार सांगूनही कंत्राटदाराकडून पालिकेच्या सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याचा ठपकाही या पत्रात ठेवण्यात आला आहे.