बांधकाम साहित्याचे दर वाढले; घराचे बांधकाम झाले महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:43 AM2020-12-07T11:43:03+5:302020-12-07T11:43:13+5:30
Construction materials prices increased; वाळू, सिमेंट, सळई आणि विटांचे दर वाढल्याने बांधकामाचा खर्च दुप्पट वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : वाळू, सिमेंट, सळई आणि विटांचे दर वाढल्याने बांधकामाचा खर्च दुप्पट वाढला आहे. शिवाय मजुरीतही मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम करणे अवघड झाले. लाकडाऊननंतर स्टीलच्या दरात जवळपास २५ टक्के वाढ झाली असून, वाळूचा दर दुप्पटीपेक्षाही वाढला आहे.
तालुक्यासह शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील काही नद्या व नाले मोठ्या प्रमाणात वाहतात. मात्र, खामगाव शहर व परिसरात मागील काही वर्षापासून वाळूचा दर अचानक वाढविण्यात आला. एकीकडे वाळू घाटांचा लिलाव रखडला आहे. परिणामी दरच निश्चित झाले नाहीत. त्यामुळे स्थानिकची वाळू ६ ते ७ हजार ब्रासप्रमाणे विक्री होत आहे. शिवाय, विटांचे भावही २० टक्क्यांनी वाढले असल्याने अनेकांचे बांधकाम बजेट कोलमडले आहे.
वीटभट्टीसाठी लागणारा कच्चा माल माती, थर्मलहून येणारी राख महागली आहे. तसेच मजुरीही वाढली असल्याने उत्पादनाचा खर्च वाढला. डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला असल्याने दरात १० ते १५ वाढ झाल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात आले. बांधकाम करणारे कारागीर, मजूर लॉकडाऊनमध्ये गावी परतले. यात परप्रांतीय मजुरांची संख्या लक्षणीय होती.
घरकूल योजनेतून सुरू करण्यात आलेल्या बांधकामांना निधी अपुरा पडत असल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. अनेकांचे काम अर्ध्यावर थांबले आहे. बांधकामाचा खर्च वाढल्याने घरमालकांचे आर्थिक नियोजनही कोलमडले आहे. यासाठी आता काहींना कर्ज काढावे लागत आहे.
बांधकाम साहित्याचे दर का वाढले?
n जिल्ह्यात नदीपात्रात वाळू असतानाही लिलाव झाले नाहीत. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूक झाली, यात अनेकांची देवाणघेवाण असल्याने ग्राहकांना नाहकपणे जास्तीची रक्कम द्यावी लागत आहे.
n सध्या संग्रामपूर, शेगाव तालुक्यातून वाळू येत असून याच वाळूचा वापर गिलाव्यासाठी केला जात आहे. बांधकामासाठी दगडापासून तयार करण्यात येणारे क्रश वापरले जाते. त्या कृत्रिम वाळूचा भाव ३ हजार ५०० ते ४ हजार २०० ब्रास आहे.
लॉकडाऊन काळात बांधकामांची संख्या कमी होती. वाहतुकीची अडचण झाल्याने सिमेंट, सळईच्या दरात काही प्रमाणात दरवाढ झाली होती. दिवाळीनंतर सळईच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्याचा बांधकामावर परिणाम होत आहे.
- असलम पटेल
बांधकाम साहित्य विक्रेता