बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यात यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:37+5:302021-08-21T04:39:37+5:30
तालुका मजदूर संघटनेची मागणी चिखली : बांधकाम कामगारांना दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी कामगारांना ९० दिवसांचे ...
तालुका मजदूर संघटनेची मागणी
चिखली : बांधकाम कामगारांना दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी कामगारांना ९० दिवसांचे मुजरीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, नगर परिषदेने काही महिन्यांपासून सदर प्रमाणपत्र देणे बंद केले असल्याने कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याने नगर परिषदेच्यावतीने बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका मजदूर संघटनेने दिला आहे.
यानुषंगाने नगर पालिका मुख्याधिकारी निवेदन सादर करण्यात आले आहे. यामध्ये मागील काही महिन्यांपासून चिखली नगर परिषद कार्यालयाने प्रमाणपत्र बंद केले असल्याने बांधकाम कामगार वणवण भटकत आहे. प्रमाणपत्राशिवाय बांधकाम कामगार मजुराचे पंजीकरण, नूतनीकरण शक्य नाही. प्रमाणपत्र न मिळाल्याने काही बांधकाम कामगार शासनाच्या योजनापासून वंचित राहिलेले आहे. यापूर्वीही याबाबत फेब्रुवारी महिन्यात निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही नगर परिषदेने गरजू बांधकाम कामगारांना ९० दिवसांच्या मजुरीचे प्रमाणपत्र दिलेले नाही. तरी याबाबत तत्काळ कारवाई होऊन बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यात यावे, अन्यथा जिल्हा मजदूर संघटनेच्यावतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख तौफीक यांनी दिला आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष शेख इम्रान, हारूण शहा, शकील शहा, शेख सादिक, शेख नदीम, शेख सलीम, शेख शाबीर आदी उपस्थित होते.