लाेणार शहरात दूषित पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:46+5:302021-05-09T04:35:46+5:30
लोणार : मागील दोन-तीन वर्षांपासून शहराला पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...
लोणार : मागील दोन-तीन वर्षांपासून शहराला पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
मे महिन्यात उन्हाचा पारा वाढला आहे. अशातच काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे़ काेराेना रुग्ण वाढतच असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे़ त्यामुळे नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करणे बंद केले आहे़ दुसरीकडे पालिका प्रशासनाकडून १० ते १५ दिवसआड होणार पिवळसर दूषित पाणीपुरवठा होतो. यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपायांची उधळपट्टी करून बोरखेडी धरणावरून सुजल निर्मल फिल्टर प्लांट योजना सुरू करण्यात आली; पण एकदाही नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले नाही. पिपळसर दूषित पाणी नागरिकांना नाईलाजास्तव घरातच साठवून ठेवावे लागते. शहराला पाणी पुरवठा करणारी काळी पाणी योजना, गायखेड, जनुना या तीन योजना व बोरखेडी अशा एकूण चार योजना असतानाही शुद्ध पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे़ कोट्यवधी रुपायांच्या योजना असूनही त्याचा फायदा हाेत नसल्याचे चित्र आहे़
मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागात वेळोवेळी लेखी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली; पण याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. याला प्रशासनच जवाबदार आहे़
आबेदखान मोमीन खान
पाणीपुरवठा सभापती
नगर परिषद, लाेणार