माेताळा शहरात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:34 AM2021-03-17T04:34:51+5:302021-03-17T04:34:51+5:30
माेताळा : शहराला नगरपंचायतीमार्फत सतत लाल व अळ्यायुक्त दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य ...
माेताळा : शहराला नगरपंचायतीमार्फत सतत लाल व अळ्यायुक्त दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकजण आजारी पडत आहेत. त्यातच सध्या कोरोनासदृश परिस्थिती असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
मोताळा शहराला नगरपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यातच मागील काही दिवसांपासून शहराला लाल व अळ्यायुक्त पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील प्रभाग क्र. ७मधील नागरिकांना १५ मार्च रोजी नळाद्वारे पाणी सोडण्यात आले. त्यामध्ये अतिप्रमाणात लालसर रंगाच्या अळ्या दिसून आल्या. तसेच भांड्यात पाणी टाकल्यास त्यावर फेस येऊन पिवळसर रंगाचे पाणी दिसत होते. यापूर्वीही संपूर्ण शहरात लाल अळ्यायुक्त तसेच फेसयुक्त पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी काही नागरिकांनी नगरपंचायत गाठून त्या पाण्याचे नमुने बरणीतून नेऊन तोंडी तक्रार केली होती. त्यावेळी नगरपंचायतीकडून यापुढे असा दूषित पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. परंतु नगरपंचायत दिलेल्या शब्दावर कायम नसून शहराला सतत दूषित पाणीपुरवठा करत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.