कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच इन्शुरन्स नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:09 AM2021-05-03T11:09:46+5:302021-05-03T11:10:10+5:30

Do not have insurance cover : या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १२७ जण कोरोना बाधितही होऊन गेले आहे.

The contract staff at Covid Care Center do not have insurance | कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच इन्शुरन्स नाही

कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच इन्शुरन्स नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ३३ शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच  इन्शुरन्स नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १२७ जण कोरोना बाधितही होऊन गेले आहे. दरम्यान एका कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहेत. आधी फ्रंटलाइन वर्कर्सचा इन्शुरन्सचा हप्ता केंद्र सरकार भरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून तोही बंद करण्यात आला आहे. त्यातच आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा विम्याचा मुद्दा समोर आला आहे. गेल्या वेळी कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने कमी करण्यात आले होते. त्यावेळीही या कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती.  मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. एनआएचएममध्ये या कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जावे, अशी पूर्वीपासूनची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. 
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनाही मधल्या काळात या कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी रेटली होती. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले आहे. मात्र त्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, असे नीलेश इंगळे, दयानंद गवई व सहकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकट काळात देत असलेल्या सेवेचाही  प्रशासनाने विचार करावा, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.


कोविड केअर सेंटरवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी मागणी आहे. किमानपक्षी तूर्तास एनआरएएममध्ये तरी समाविष्ट केले जावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी आमचा लढा सुरू आहे.
-अमोल गवई, जिल्हाध्यक्ष


कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी समावून घ्यावे, अशी आमची प्रमुख मागणी असून, या मागणीसाठी आम्ही आंदोलनात्मक भूमिकाही घेतली होती. दरम्यान, विमा संरक्षण व संबंधित सुविधा न मिळाल्यास प्रसंगी आम्ही कामबंद आंदोलनही करू.
-शेख जहीर शेख शब्बीर, 
कोविड योद्धा कर्मचारी परिषद, अभियान प्रमुख

Web Title: The contract staff at Covid Care Center do not have insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.