महावितरणमधील सरळसेवा भरतीमुळे कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:28 PM2019-07-15T12:28:28+5:302019-07-15T12:31:12+5:30
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने भरतीप्रक्रियेस विरोध करीत न्यायालयाची दारे ठोठावण्याची भूमिका घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महावितरण कंपनीमधील रिक्त पदांसाठी होऊ घातलेल्या सरळसेवा भरतीमुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करणारे कंत्राटी कामगार दुखावले आहेत. भरतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भावना त्यांच्यामधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने भरतीप्रक्रियेस विरोध करीत न्यायालयाची दारे ठोठावण्याची भूमिका घेतली आहे.
महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी ५ हजार आणि उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार जागा जागांची भरती काढली आहे. या रिक्त पदांवर राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची नेमणूक ऊर्जा खात्याने केली होती. गेली १० ते १५ वर्षे अत्यंत कमी वेतनात हे कामगार काम करीत आहेत. कमी मोबदल्यात काम करुन कंत्राटी कामगारांनी वीज कंपन्यांचे अब्जावधी रुपये वाचवले आहेत. कंत्राटी कामगारांच्या अनुभवाचा विचार न करता महावितरण कंपनीने शासनाने निर्धारित केलेल्या वयाच्या विरोधात जाऊन अर्ज करण्यासाठी ३२ वर्षापर्यंतच पात्रता ठेवली आहे. रिक्त पदांवर गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे अनेकजण वयाच्या अटीत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांना या पदांवर आधी सामावून घ्यावे, त्यांना या भरतीत वयात सूट मिळावी, विशेष बाब म्हणून ३० टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची २०१२ पासून मागणी आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नाही.
जिल्ह्यात २५० कंत्राटी कामगार
महावितरण कंपनीत जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर जवळपास २५० कंत्राटी कामगार काम करीत आहे. जीव धोक्यात घालून १० ते १५ वर्षांपासून ते सेवा देत आहेत. अत्यंत कमी वेतनावर काम करुन कुटूंबाचा गाडा चालवित आहेत. महावितरण कंपनीच्या सरळसेवा भरतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यास त्यांचे कुटूंब रस्त्यावर येईल. कंत्राटी कामगारांना भरतीत सवलतीसह प्राधान्य देण्याची गरज आहे.
महावितरणची सरळसेवा भरती कंपनीच्या मुख्य कार्यालयातून राबविली जाणार आहे. रिक्त पदांची भरती, आरक्षण, निवड प्रक्रिया सर्व काम तेथूनच होणार आहे.
- दीपक देवहाते
अधीक्षक अभियंता, महावितरण, बुलडाणा
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने १० जुलै ऊर्जामंत्र्यांना पत्र देऊन भरतीप्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. त्यावर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना तातडीने संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. या बैठकीतून न्याय मिळाला नाही तर संघटना रस्त्यावर उतरणार आहे.
- नीलेश खरात
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ