स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रसंतांचे योगदान दुर्लक्षित
By Admin | Published: August 13, 2015 12:01 AM2015-08-13T00:01:22+5:302015-08-13T00:01:52+5:30
क्रांतिज्योत यात्रा नियोजनप्रमुख कराळे यांची खंत.
बुलडाणा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भारतीय स्वातंत्र्यलढय़ात मोठे योगदान राहिले. १९४२ चा लढा पुकारल्यानंतर राष्ट्रसंतांनी खंजिरीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल प्रज्वलीत केली. त्यापासून प्रेरणा घेत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले गेले; मात्र त्यांचे हे योगदान शासनाकडून दुर्लक्षित राहिले असल्याची खंत श्रीगुरूदेव क्रांतिज्योत यात्रेचे नियोजन प्रमुख व श्रीगुरूदेव सेवामंडळाचे विदर्भ प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. श्रीगुरुदेव क्रांतिज्योत यात्रेचे बुधवारी बुलडाण्यात आगमन झाले, त्यावेळी त्यांनी 'लोकमत'शी संवाद साधला.
प्रश्न : श्रीगुरुदेव क्रांतिज्योत यात्रेचा उद्देश काय आहे ?
-मी सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे, वंदनीय गुरुदेवांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान हे शासनाकडून दुर्लक्षितच राहिले आहे. गुरुदेवांचे हे कार्य आजच्या तरुण पिढीला कळावे, शहिदांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे व लोकांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत व्हावी, इतिहासाची माहिती व्हावी, हे उद्देश पुढे ठेवून ही यात्रा सुरू केली आहे. क्रांतिदिनी या यात्रेला प्रारंभ झाला असून, विदर्भातील सर्व तालुक्यांमध्ये तरुण तसेच विद्यार्थ्यांशी ही यात्रा संवाद साधत आहे.
प्रश्न : राष्ट्रपुरुषांच्या यादीत वंदनीय गुरुदेवांचे नाव नाही. यासाठी कुठले आंदोलन छेडणार आहात का ?
-देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात गुरुदेवांच्या कार्याचा उल्लेख नाही, त्यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत नाही, ही बाब सर्वप्रथम ह्यलोकमतह्णने उघड करून त्याबाबत पाठपुरावा केला, हे आवर्जून सांगतो. आम्ही गुरुदेवभक्त शासनाकडे याबाबत पाठपुरावा करीत असून, येणार्या नागपूर अधिवेशनात विधान भवनासमोर भजन-कीर्तनाद्वारे आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांपर्यंंत आम्ही गुरुदेवभक्तांची भूमिका पोहचविली आहे.
प्रश्न : गुरुदेवांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाबाबत कशा प्रकारे प्रचार-प्रसार करत आहात ?
-वंदनीय राष्ट्रसंतानी चिमूर, आष्टी, बेनोडा, मोझरी, ब्रम्हपुरी अशा अनेक ठिकाणांसोबतच संपूर्ण विदर्भात राष्ट्रप्रेमाची क्रांती घडवून आणली. महाराजांना २८ ऑगस्ट १९४२ रोजी चंद्रपुरात अटकही झाली होती. त्या काळात झालेला जंगल सत्याग्रह असो वा इतर आंदोलने, त्यांचा इतिहास लिखित स्वरूपात आम्ही तरुणांपर्यंत पोहचवित आहोत.
प्रश्न : प्रचाराच्या नव्या साधनांचा आधार घेत आहात का ?
-होय! बदलत्या काळातील प्रचाराची साधने लक्षात घेऊन आम्ही आता गुरुदेवांच्या कार्यावरील सीडी तयार केल्या असून, त्यासुद्धा या यात्रेदरम्यान वितरित करीत आहोत. लवकरच 'गुरुदेव' चॅनलही सुरू करीत असून, त्या माध्यमातून प्रचार प्रसाराला अधिक गती येईल. यासोबतच व्हॉट्सअँप, फेसबूक यांसारख्या माध्यमातून गुरुदेवभक्त राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करीत असतात.
प्रश्न : क्रांतिज्योत यात्रेला प्रतिसाद कसा आहे ?
-उत्तम आहे! गावागावांत तरुणांना गुरुदेवांच्या कार्याची माहिती दिली जाते. श्रीगुरुदेव केंद्रीय प्रचार कार्यालयाचे प्रचारप्रमुख बबनराव वानखेडे हे यात्रेचे प्रमुख असून, ते अनेक ठिकाणी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उत्सुक नागरिकांचे शंकानिरसन करतात. पुस्तके, ग्रामगीता, सीडी या माध्यमातून साहित्याची खरेदीही विद्यार्थी करतात. गेल्या तीन वर्षांंपासून या यात्रेने विविध शहरांना भेटी दिल्या. व्यापक प्रमाणात जनजागृतीचा उद्देश यानिमित्ताने सफल होत आहे.