भ्रष्टाचारावरून खामगाव नगर पालिकेच्या सभेत वादंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:46 PM2019-08-20T14:46:49+5:302019-08-20T14:46:53+5:30
विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले. विषयसूचीवरील पहिल्याच विषयावर गदारोळ सुरू झाल्याने सोमवारची सभा चांगलीच वादळी ठरली. तथापि, या सर्वसाधारण सभेत विविध ३० विषयांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ७ विषयांवर विरोधकांनी आपला कडाडून विरोध दर्शविला.
खामगाव शहरातील विकासाला गती देण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता स्थानिक नगर पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा अनिता डवरे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या अनुपस्थितीत उप मुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी यांनी सभेचे कामकाज पाहीले. यावेळी विषय सूचीवरील मागील सर्वसाधारण सभेचे वृत्तांत कायम करण्याच्या पहिल्याच विषयाला काँग्रेस नगरसेवक प्रविण कदम यांनी आक्षेप नोंदविला. गत साडेतीन महिन्यांपासून पालिकेच्या विविध सभांमध्ये मंजूर झालेल्या ठरावाचे कार्यवृत्त विरोधी पक्षाला देण्यात आलेले नाहीत. नियमावलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नगरसेवक प्रविण कदम भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सतीशआप्पा दुडे, ओमप्रकाश शर्मा, हिरालाल बोर्डे, आरोग्य सभापती दुर्गा हट्टेल यांनी नगरसेवक प्रविण कदम यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्षेप नोंदविला. त्याचप्रमाणे यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक खडाजंगीही उडाली. अपशब्द वापरून सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी नगरसेवक कदम यांनी माफी मागावी, असा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी नगराध्यक्षांनी नगरसेवक कदम यांना ताकीद देत, प्रकरण मिटविले. त्यानंतर विषय सुचीवरील विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी सभेचे कामकाज पुढे सुरू झाले.
कलम ३७० च्या अभिनंदन ठरावास विरोध!
काश्मीरमध्ये केंद्र शासनाने कलम ३७० रद्द केल्याबाबत केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी मांडला. या ठरावाला नगरसेवक सतीशआप्पा दुडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला काँग्रेस नगरसेवकांनी विरोध दर्शविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी तटस्थता दर्शविली. सभागृहात भारिप नगरसेवक विजय वानखडे अनुपस्थित होते.