‘त्या’ मुलांच्या संरक्षणासाठी सहकार्य करा -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:34+5:302021-07-07T04:42:34+5:30
बुलडाणा : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या बालकांच्या पाल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित नगर परिषदेकडून बालकल्याण समितीला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार ...
बुलडाणा : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या बालकांच्या पाल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित नगर परिषदेकडून बालकल्याण समितीला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे, तसेच पोलीस विभागाच्या वतीने ० ते १८ वयोगटातील बालकांची काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने सहकार्य करावे व बालकल्याण समितीला सादर करावे. याप्रकरणी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या बालकांप्रकरणी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक महेंद्र बनसोड, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड. आरिफ सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रामरामे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, महिला व बालविकास अधिकारी मारवाडी, बालसंरक्षण अधिकारी मराठे आदी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत चाइल्ड लाइन यांनी १०९८ हेल्पलाइनचा प्रचार करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, याबाबत विविध कार्यालयांत आयईसी साहित्य, पोस्टर्स लावावेत. या हेल्पलाइनचा प्रचार-प्रसार करावा. संबंधित विभागाच्या वतीने कोविडदरम्यानची माहिती सविस्तरपणे शहानिशा करून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. त्याचप्रमाणे कोविडदरम्यान अनाथ झालेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांच्या संपत्तीचे हस्तांतरण जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, बुलडाणा यांच्या वरिष्ठ सरकारी वकिलांच्या मार्गदर्शनाखाली संपत्तीबाबत निर्णय घेण्यात यावा.
काेराेनामुळे १० मुले झाली अनाथ
जिल्ह्यात कोविडमुळे १० बालके अनाथ झाली आहेत. यामध्ये चार मुले व सहा मुलींचा समावेश आहे. एक पालक मृत झालेल्या बालकांची संख्या २७२ आहे़ यामध्ये १४६ मुले आणि १२६ मुलींचा समावेश आहे. बालकल्याण समितीमार्फत २२३ प्रकरणांमध्ये गृह चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बालकल्याण समितीमार्फत समक्ष सादर करण्यात आलेल्या बालकांची संख्या ४९, बालकल्याण समितीमार्फत एक पालक असलेल्या आणि ताबा घेतलेल्या बालकांची संख्या ४० व अनाथ बालकांची संख्या ९ आहे.