सहकारी सोसायट्याही उतरणार नाविन्यपूर्ण उद्योगात; १० सोसायट्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:00 PM2018-08-25T18:00:47+5:302018-08-25T18:03:22+5:30
बुलडाणा : पीक कर्ज वाटपापुरते मर्यादीत कार्यक्षेत्र झालेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्या आणि ग्रामसेवा सहकारी सोसायट्यांची व्याप्ती वाढवून त्यांच्या सक्षमीकरणासोबतच बळकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने पावले टाकण्यास प्रारंभ केला असून बुलडाणा जिल्ह्यातील १० सोसायट्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : पीक कर्ज वाटपापुरते मर्यादीत कार्यक्षेत्र झालेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्या आणि ग्रामसेवा सहकारी सोसायट्यांची व्याप्ती वाढवून त्यांच्या सक्षमीकरणासोबतच बळकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने पावले टाकण्यास प्रारंभ केला असून बुलडाणा जिल्ह्यातील १० सोसायट्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी मानव विकास कार्यक्रमातंर्गत एकट्या जळगाव जामोद तालुक्याला १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, सहकारी पणन व्यवस्थेशी राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था व महिला स्वयंसहाय्यता गटांना जोडून ग्रामीण भागातील बेरोजगारीला लगाम लावण्याचा या मागे उद्देश असून राज्यातील पाच हजार संस्थांच्या सक्षमीकरणाला यात प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुषंगाने आतापर्यंत ५०९ सहकारी पणन संस्थांनी स्वबळावर नवीन व्यवसाय सुरू केले असून ३२८ संस्था त्या तयारीत असल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. दुसरीकडे राज्यातील १२५ तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न होत असून त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनातंर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी सहकार विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात त्यातंर्गत उपक्रम राबविण्यात येत असून मानव विकास आयुक्तांकडून खासकरून राज्यात एकमेव जळगाव जामोद तालुक्यात या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी, साठी कृषी पुरक व्यवसायासाठी दहा ग्रामसेवा सहकारी संस्थांना १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी अनुषंगीक विषयान्वये उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रस्तावास मानव विकास आयुक्तालयाने मान्यता दिल्याने ग्रामसेवा सोसायट्यांना आता कृषी पुरक उद्योग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाविन्यपूर्ण उद्योगातून रोजगार
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव, पिंपळगाव काळे, जळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था, जामोद, सुनगाव, मडाखेड, वडशिंगी, सावरगाव, खेर्डा खुर्द, खांडवी येथील ग्रामसेवा सहकारी संस्थांची असे उद्योग उभारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात मिरची कांडन, पिठाची गिरणी आणि सर्जिकल कॉटन सारखे उद्योग सुरू करण्यासाठी या सहकारी संस्थांना हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोबतच अशा नाविन्य पूर्ण उद्योगातून या संस्थांनी शेतमाल तारण व्यवसाय, राशन दुकान, मेडीकल शॉप, शॉपींग मॉल सारखे उद्योग ग्रामीण भागात सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
मानव विकासतंर्गत एकमेव जिल्ह्याला निधी
मानव विकासात पिछाडीवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यात मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमातंर्गत औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्तालयाने एकमेव बुलडाणा जिल्ह्यासाठी हा निधी दिला आहे. मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी प्राधान्याने आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक निर्देशांक वाढवावा लागतो. त्यानुषंगाने आर्थिक निर्देशांक वाढविण्यासाठी बेरोजगारीचे प्रमाण कमी करून रोजगार उपलब्धतेसाठी हा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील १५ ग्रामसेवा सोसायट्यांमध्ये टप्प्या टप्प्याने असे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करणार्यावर येत्या काळात भर दिल्या जाणार आहे.