कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी - वायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:59 PM2018-01-30T13:59:54+5:302018-01-30T14:01:18+5:30
परिक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी, असे मार्गदर्शन पालक-विद्यार्थी मेळाव्यातून प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ यांनी केले.
साखरखेर्डा : हे युग स्पर्धेचे युग असून जो विद्यार्थी स्पर्धा करेल ते टिकेल. यासाठी प्रत्येकाने शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी परिक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी, असे मार्गदर्शन पालक-विद्यार्थी मेळाव्यातून प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ यांनी केले.
ते साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित पालक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच पूनम पाटील होत्या तर उद्घाटक म्हणून जि.प.सदस्य रामभाऊ जाधव होते. यावेळी स्नेहल पाटील, संस्थेचे संचालक चंद्रशेखर शुक्ल, डिगांबर पाटोळे, साहेबराव काटे, प्रा.ऋषीकेश शुक्ल, गणपत अवचार, पं.स.सदस्य शे.शफी शे.गुलाब, बाबुराव काळे, चिखली अर्बनचे अनंता धांडे, पिंपळे, सेवानिवृत्त पीएसआय नवले, प्राचार्य एस.टी.दसरे उपस्थित होते. सकाळी ११ ते ५ पर्यंत स्नेहसंमेलन, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत भाग घेणारे अंकूश इंगळे आणि चेतन रबडे या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. संचालन रामदास पाझडे, आभार पर्यवेक्षक भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मगन रबडे, किशोर कामे, दर्शन गवई, रामदास खरात यांचे सहकार्य लाभले.