CoranaVirus : प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:08 AM2020-05-27T10:08:12+5:302020-05-27T10:10:09+5:30
निमखेड येथील एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
बुलडाणा: देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथील एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही आता २७ मे रोजी सकाळी बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. हा पोलिस प्रशिक्षणार्थी २० मे रोजी बुलडाणा जिल्ह्यात आला होता.
मुंबई येथे कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची एक तुकडी राखीव ठेवण्यात आली होती. या तुकडीमध्ये हा पोलिस प्रशिक्षणार्थी होता. दरम्यान, नंतर त्यांना परत पाठविण्यात आले होते. परतीच्या प्रवासात या कर्मचाºयाचा लातूर येथील त्याच्या सहकाºयाशी निकटचा संपर्क आला होता. आणि लातूरचा त्याचा सहकारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे निमखेड येथे २० मे रोजी पोहोचल्यानंतर या पोलिस कर्मचाºयाने स्वत:ला शेतातच विलगीकरण करून घेतले होते. दरम्यान, आरोग्य विभागाला याची माहिती लातूर येथून मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या पोलिस कर्मचाºयाशी संपर्क साधून त्यास २१ मे रोजी बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल केले. २७ मे रोजी या पोलिस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा देऊळगाव राजाचे आरोग्य पथक हे निमखेड येथे सकाळी पोहोचले असून तेथून त्याच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी बुलडाणा येथे या पथकाने पाठविले आहे.
सुरक्षीततेबाबत घेतली खबरदारी
या प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाºयाने सुरक्षीततेबाबत संपूर्ण खबरदारी घेतली होती. आपला लातूर येथील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पोलिस कर्मचाºयाने स्वत:स विलग करून घेतले होते. कौटुंबिक पातळीवरही त्याने सुरक्षीत अंतर राखले होते. त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला फारसे संक्रमण होण्याचा धोका नसल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. सोबतच या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये फारसे व्यक्ती नसून खबरदारी म्हणून निमखेड येथील सहा जणांना आरोग्य तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे.