तरुणाई बनली कोरोना रुग्णांचे सारथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:22+5:302021-05-17T04:33:22+5:30
हिवरा आश्रम : कडक निर्बंधाच्या काळात कोरोना रुग्णांना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहने मिळणे अवघड झाले आहे. सोबत कुणी ...
हिवरा आश्रम : कडक निर्बंधाच्या काळात कोरोना रुग्णांना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहने मिळणे अवघड झाले आहे. सोबत कुणी यायला तयार नाही. वाहन मिळाले तर अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी होते. याचा विचार करून हिवरा आश्रम व परिसरातील तरुणांनी एकत्र येत रुग्णांना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी नि:शुल्क सेवा सुरू केली आहे. तरुणाई कोरोना रुग्णांचे सारथी बनल्याने युवकांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
कोरोनामुळे ग्रामीण भागातील काही असाहाय्य रुग्णांना दवाखान्यात पोहोचवायला कोणीच येत नाही. दवाखान्यापासून खेडे दूर असेल, तर त्या रुग्णाला दवाखान्यापर्यंत वाहनांची कोणतीही सुविधा उपलब्ध होत नाही. ही अडचण आणि स्वतःवर आलेली आपत्ती यातून प्रा. नीलेश निकस यांनी त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीतून पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांना दवाखान्यापर्यंत मोफत पोहोचवून देण्याचे कार्य हाती घेतले आहे.
निकस यांनी सुरू केलेल्या सेवाभावी उपक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आसपासच्या गावांमध्ये पोहोचवली व स्वतःचे चारचाकी वाहन असणाऱ्यांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले. प्रा. निकस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अमोल म्हस्के, नीलेश निकस, पवन शेळके, ओम निकस, बाळू राहाटे, विजय चव्हाण, नागेश चव्हाण, नीलेश काळे, रवी डुकरे, पंजाब पवार यासह अनेक तरुणांचा यात समावेश आहे. कोरोनाग्रस्तांचे प्रा. निकस यांनी स्वतः अनेक वाईट अनुभव घेतले. त्या सर्व अनुभवातून त्यांनी ही समाजसेवा करण्याचे ठरवले.
विनामूल्य सेवा
कोरोनाच्या काळात रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन लवकर मिळत नाही. मिळालेच तर किंमत खूप मोजावी लागते. म्हणून अशा लोकांसाठी विनामूल्य सेवा मेहकर, चिखली, बुलडाणापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे.
प्रा. निकस यांच्या उपक्रमात आम्ही सहभागी आहोत. इतर तरुणांनीसुद्धा पुढे यावे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या परिसरात हा उपक्रम सुरू करावा. जेणेकरून नागरिकांची लूट आणि शोषण होणार नाही आणि वेळेवर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे प्राणही वाचतील.
अमोल म्हस्के, युवा कार्यकर्ते, ब्रम्हपुरी.