विवाह सोहळ्यांंच्या मंगल सनईत ‘कोरोना’ चा बेसूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:24 AM2020-03-28T11:24:33+5:302020-03-28T11:24:39+5:30
मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणाऱ्या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : कोरोना विषाणूमुळे लग्न सोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून मंगल कार्यालय व लॉन्सचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणाऱ्या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.
‘कोरोना’चे वादळ जगभर पसरले आहे. सध्या २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ असल्याने व्यवसाय आणि उद्योगांना कुलुप लागले आहे. मंगल कार्यालय व लॉन्समध्येही शुकशुकाट आहे. एरव्ही वºहाडी मंडळींच्या उत्सवी थाटाने गजबजणाºया मंगल कार्यालयांमध्ये कमालीचा सन्नाटा असून कोरोना पासून खबरदारी म्हणून विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. यामुळे कोटी रुपयात होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. याचा थेट फटका विवाह सोहळ्याची निगडीत असणाºया अन्य व्यवसायिक व छोट्या घटकांना बसला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत घरगुती विवाह सोहळे पार पाडण्याचे नियोजन केले जात आहे. मार्चच्या दुसºया पंधरवड्यात असे घरगुती विवाह सोहळे संपन्न झाले.
तारखा रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान
‘कोरोना’ मुळे विवाह सोहळे पुढे ढकलल्या जात असून मार्च, एप्रिल व मे महिन्यांमध्ये बुकिंग केलेल्या तारखा रद्द केल्या जात आहेत. यापूर्वी तारीख रद्द झाल्यास अॅडव्हान्स म्हणून जमा केलेल्या रकमेतून ५० टक्के रक्कम मंगल कार्यालय चालक परत देत नसत. तथापि ‘कोरोना’ आपत्तीमुळे मंगल कार्यालय मालकांना भरलेली पूर्ण रक्कम परत करावी लागत आहे. यामुळे मोठे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान होत आहे.
कापड व्यावसायिकांनाही मोठी झळ
वधू-वरांपासून ते जवळच्या वºहाडी मंडळींसाठी रेडीमेड कपडे खरेदी केली जातात. विवाह सोहळ्यांवर या मार्केटचे मोठे बजेट असते. आहेर म्हणून देण्यात येणाºया साड्या व इतर वस्तू खरेदी रद्द झाल्याने कापड दुकानदार व रेडिमेड कपडे विक्रेते हतबल झाले आहेत.