कोरोनाबाधित असून गावात फिरणाऱ्यांना बसणार लगाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:32+5:302021-05-26T04:34:32+5:30
कोरोनाबाधित आहे, मात्र लक्षणे दिसत नाहीत, तरीही विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कारणास्तव काही नागरिक ...
कोरोनाबाधित आहे, मात्र लक्षणे दिसत नाहीत, तरीही विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कारणास्तव काही नागरिक कोरोना विषाणूची चाचणी करून घेण्यास इच्छुक नसतात किंवा चाचणी करून घेत नाही. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना काही अटी व शर्तींच्या अधीन राहून गृह विलगीकरणामध्ये राहण्यास (होम आयसोलेशन) मुभा देण्यात आलेली होती. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. रुग्ण गृह अलगीकरण झाल्यानंतर अलगीकरण न राहता गावात मुक्त संचार करीत असल्याने ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड बाधित रुग्ण आढळून येत असून रुग्ण गंभीर होतात. त्याकरिता उपाययोजनांचा भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांनी ग्रामीण भागामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्याबाबत निर्देशित केल्याप्रमाणे त्यांच्याद्वारे ग्रामीण भागात आयसोलेशन सेंटर उभारून कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी आदेशाचा वापर करून कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याचे उपाययोजनेचा भाग म्हणून शहरी व ग्रामीण भागातील ज्या कोविडबाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांना गृह अलगीकरण हा पर्याय न देता त्यांना सोईस्कर अशा संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात यावे, कोणत्याही स्वरूपात गृह अलगीकरण राहण्याकरिता परवानगी देण्यात येऊ नये, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्णांपासून इतरांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यामुळे यासाठी सर्वानी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून ग्रामस्तरीय समितीला सहकार्य करावे, असे आवाहन डाॅ. विशाल मगर यांनी केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणे दिसत नसली, तरी त्यांना ग्रामपातळीवर उभारलेल्या विलगीकरण कक्षातच राहावे लागणार आहे. गंभीर असलेल्या रुग्णांना कोविड सेंटर येथे पाठविण्यात येईल.
डाॅ. विशाल मगर, तालुका आरोग्य अधिकारी, मेहकर.