Corona in Buldhana : पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणाचे प्रशासनासमाेर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:50 AM2021-05-26T10:50:08+5:302021-05-26T10:50:13+5:30
Corona in Buldhana: १५.११ टक्के असलेला सरासरी रेट १० टक्क्यांच्या खाली आणण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: राज्यातील कोरोना संक्रमण अधिक असलेल्या १४ जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यासाठी जिल्ह्याचा सध्या १५.११ टक्के असलेला सरासरी रेट १० टक्क्यांच्या खाली आणण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
त्यातच वरिष्ठ स्तरावरील निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गंभीरतेने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बाधित व्यक्तीच्या अतिनिकट व निकट संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विखुरलेल्या पद्धतीने कोरोनाच्या चाचण्या न करता बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात प्रतिदिन किमान दहा हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असले तरी वर्तमान स्थितीत सरासरी सहा हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये आणखी दोन हजारांची वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाहता १४ लाख व्यक्तींचे ट्रेसिंग करण्यात सध्या यंत्रणा व्यस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठ दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे. २५ मे रोजी तो तो ९.०८ आहे. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती सुधारत असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती म्हणाले.
त्यामुळे १ जूननंतर जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता मिळेल का, याबाबत विचारणा केली असता टप्प्याटप्प्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्यात शिथिलता मिळले. मात्र, त्यासाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे जनसामान्यांनी पालन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
दोन्ही टास्क फोर्सचे गठण
म्युकरमायकोसिस आजाराच्या संदर्भाने उपाययोजना व उपचार करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, कोरोनाबाधित लहान मुलांवर नेमके कोणते व कसे उपचार करावेत, याबाबतचाही जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या नवीन म्युटेशनचा लहान मुलांना धोका असण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व बालरोग चिकित्सकांची एक कार्यशाळाच प्रशासन घेणार असल्याचे ते म्हणाले.
पायाभूत सुविधांवर भर
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले. व्हेंटिलेटर्स, सीसीसी, कोविड हाॅस्पिटल व ग्रामीण भागात विलगीकरण कक्षही उभारण्यात आले आहेत. यासोबतच चार खासगी कोविड रुग्णालयांसह शासकीय ७ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट निर्मितीचेही काम वेगाने सुरू आहे. वर्तमान स्थितीत यापैकी पाच ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झालेले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.