Corona Cases in Buldhana : बुधवारी ७ जणांचा मृत्यू, १७५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:03 AM2021-06-03T11:03:29+5:302021-06-03T11:03:36+5:30
Corona Cases in Buldhana: बुधवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला तर १७५ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला तर १७५ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ९९४ संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ७५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ३२, खामगाव १५, शेगाव १६, देऊळगाव राजा ९, चिखली २४, मेहकर २५, मलकापूर १५, नांदुरा ४, लोणार ५, मोताळा ३, जळगाव जामोद ६, सिंदखेड राजा १५ आणि संग्रामपूर तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे.
रुग्णालयात उपचारादरम्यान नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील ७९ वर्षीय व्यक्ती, मेंढळी येथील ४० वर्षीय पुरुष, संग्रामपूर तालुक्यातील मनार्डी येथील ८५ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील खामखेड येथील ७५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील ७० वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील दहीद येथील ६२ वर्षीय महिला आणि बुलडाणा शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या आता ६१६ झाली आहे. दुसरीकडे बुधवारी ३३३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी केलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ८८ हजार ७१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८२ हजार ९९६ कोरोना बाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केल्याची माहिती सुत्रांनी दिली.