Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ४० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:10 AM2021-06-23T11:10:26+5:302021-06-23T11:10:31+5:30
Corona Cases in Buldhana : मंगळवारी एकाचा मृत्यू झाला तर ४० जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे मंगळवारी एकाचा मृत्यू झाला तर ४० जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण दोन हजार ७५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार ७१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, खामगाव तीन, शेगाव दोन, देऊळगाव राजा पाच, चिखली पाच, मेहकर चार, मलकापूर तीन, नांदुरा तीन, लोणार तीन, जळगाव जामोद तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा यात समावेश आहे. मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात मंगळवारी तपासणी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही.
उपचारादरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ५२ हजार ९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांपैकी ८५ हार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात अद्यापही १०० ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.