Corona Cases in Buldhana : दुसऱ्या लाटेत वाढले पाचपट रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:44 AM2021-05-17T11:44:38+5:302021-05-17T11:45:07+5:30
Corona Cases in Buldhana: पहिल्या लाटेच्या तुलनेत पाच वाढले असून तब्बल ३६२ जणांचा कोरोनामुळे अवघ्या साडेचार महिन्यात मृत्यू झाला आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला असून बाधितांचे प्रमाणही पहिल्या लाटेच्या तुलनेत पाच वाढले असून तब्बल ३६२ जणांचा कोरोनामुळे अवघ्या साडेचार महिन्यात मृत्यू झाला आहे. परिणामस्वरूप तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासकीय पातळीवरही आता ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
पहिल्या लाटेदरम्यान मुकाबल्यासाठी फारशी पूर्वतयारी करण्यास वेळ मिळाला नसला तरी दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यात बऱ्याच अंशी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतरही या लाटेचा जिल्ह्याला फटका बसला आहे. जर ही सुविधाही दुसऱ्या लाटेदरम्यान उपलब्ध नसती तर चित्र अधिक विदारक दिसले असते. मात्र दुसऱ्या लाटेची चाहूल लागताच प्रशासकीय पातळीवर पायाभूत सुविधा, दोन ऑक्सिजन प्लांट आणि दीड हजार ऑक्सिजन बेड, ४२६ ऑक्सिजनयुक्त व्हेंटिलेटर बेड जिल्ह्यात उभारण्यात आल्यामुळे या दुसऱ्या लाटेत बऱ्यापैकी जिल्ह्याने तग धरला, ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे आता संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासकीय पातळीवरही जिल्ह्यात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्याची अवश्यकता आहे.
पायाभूत सुविधांसाठी ६८ कोटी
गेल्या १४ महिन्यात कोरोनाच्या संदर्भाने पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्याला विविध योजनांमधून आतापर्यंत ६८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी जवळपास ५२ कोटी रुपायंचा खर्च गेल्या आर्थिक वर्षात झालेला आहे. टेस्टिंग किट ते ऑक्सिजन प्लांटपर्यंतच्या बाबींचा यात समावेश आहे. यासोबतच चालू आर्थिक वर्षात ८ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेले आहे. सोबतच जिल्ह्यातील सातही आमदारांच्या निधीमधून सात कोटी रुपये एप्रिल महिन्यातच नियोजन विभागाकडे जमा झाले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी निधीही उपलब्ध झालेला आहे.