कोरोना संकट; आयजी विवेक रानडे दीड तास सैलानी यात्रेत तळ ठोकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:31 AM2020-03-07T11:31:19+5:302020-03-07T11:31:25+5:30
सैलानी यात्रेत सध्या असलेल्या भाविकांना पोलिसांच्या सहकार्यातून त्यांच्या गावी परत पाठविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
बुलडाणा: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे आयजी विवेक रानडे यांनी सैलानी येथे यात्रा महोत्सवाच्या ठिकाणाची पाहणी करून अधिकाºयांशी तेथेच बैठक घेतली. दरम्यान, सध्या ते बुलडाणा येथे दाखल झाले असून, त्यांच्या या तातडीच्या भेटीचे नेमके गमक स्पष्ट होऊ शकले नाही. कोरोना संकटामुळे सैलानी यात्रा महोत्सव प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाºयांनी रद्द केला आहे. त्यामुळे सैलानी यात्रेत सध्या असलेल्या भाविकांना पोलिसांच्या सहकार्यातून त्यांच्या गावी परत पाठविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या संदर्भाने ही भेट असण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
सैलानी यात्रा महाराष्ट्रासह तेलंगणा, आंधप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानमध्येही प्रसिद्ध आहे. या सर्व भागातून जवळपास ८ लाखावर भाविक दरवर्षी यात्रेत येतात. देशात कोरोनाचे २८ संशयित रुग्ण पाहता कोरोनाचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सैलानी यात्रेतील कोरोना व्हायरसचा धोका पाहता जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी १० पथकांची बैठक घेतली. ही पथके सैलानीत जाऊन भाविकांना परत पाठविण्यासाठी काम करणार आहे. तसेच मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारीसुद्धा मदत करणार आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले रायपूर पोलिस स्टेशनमध्ये बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देणार आहेत.