कोरोनाच्या संकटामुळे कुटुंब, नात्यांमध्ये आला ‘दुरावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:50+5:302021-05-08T04:36:50+5:30
जानेफळ : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून, कोणाचे आई-वडील, तर कोणाचा मुलगा, मुलगी या ...
जानेफळ : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून, कोणाचे आई-वडील, तर कोणाचा मुलगा, मुलगी या विषाणूचे बळी ठरले आहेत. प्रत्येकावर मोठा आघात होत असताना आप्तस्वकीयांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन करतानाच काही मोलाचे सल्लेही दिले जात आहेत. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत अशा सल्ल्यांमुळे संबंधितांना जीव गमवावा लागला तर मात्र सारा दोष सल्ला देणाऱ्याच्या माथी मारला जात असल्याने अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंगही घडू लागले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे, तर कोरोना बरा होतो, तुम्ही काळजी करू नका, असे सांगून घरच्या घरी उपचार करा, असा सल्ला दिला जात आहे. घरीच उपचार करणाऱ्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्याने सल्ला देणाऱ्या जवळच्या नातेवाइकांत दुरावा निर्माण झाला आहे. जवळच्या नातेवाइकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात न नेता घरच्या घरीच उपचार करणेदेखील काहींच्या जिवावर बेतले असल्याने रक्ताच्या नात्यात फूट पडली आहे. त्यातून जवळच्या नातेवाइकांच्या विशेषत: सख्ख्या नातेवाइकांच्या शुभकार्यात तर सोडाच; परंतु कोणी मृत झाले तरी त्यांच्या अंत्यसंस्काराला न जाणे इथपर्यंत कौटुंबिक संबंध खराब होऊ लागले आहेत.
दुराव्याची विविध कारणे
कोरोना झाल्यानंतर रुग्णांची चौकशी केली नाही, रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याने आर्थिक मदत केली नाही, तसेच फोन उचलला नाही, रुग्ण बरा झाला तरी भेटायला आले नाही किंवा अंत्यसंस्काराला आले नाही. दशक्रिया विधीला हजेरी लावली नाही, अशी अनेक कारणेदेखील नातेसंबंधातील दुराव्यास कारणीभूत ठरू लागली आहेत. काही कुटुंबातील सदस्यांना कोरोना संसर्गाला जबाबदार धरून तुमच्यामुळेच कुटुंबातील सदस्य किंवा जवळची व्यक्ती गमावली, असा ठपकाही ठेवला जात असल्याने घरोघरी समज-गैरसमजुतीतून सगेसोयरे व कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दुरावले गेले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग होण्यापूर्वी एकमेकांच्या शुभकार्यात किंवा सुख-दुःखाच्या समयी धावून जात एकमेकांना सर्वतोपरी मदत करणारे आता एकमेकांशी बोलणे तर सोडाच एक-दुसऱ्याकडे बघतही नसल्याने कोरोनामुळे कौटुंबिक संबंध बिघडल्याचे चित्र दिसत आहे.