ग्रामीण भागातही वाढले कोरोनाचे मृत्यू - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:07+5:302021-04-09T04:36:07+5:30
धाड : कोरोनाच्या रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र कोरोना ...
धाड : कोरोनाच्या रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे.
ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र कोरोना आजाराची गंभीरता नागरिकांसह ग्रामपातळीवर प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाचे मृत्यू वाढले आहेत.
आरोग्य विभागाच्या तिसऱ्या फळीतील कर्मचारी, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक, तथा आशा वर्कर्स हे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करून गावागावात जाऊन कोरोनाची चाचणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन करणे, नागरिकांना कोविडचे लसीकरण करण्यासाठी आवाहन करणे, या कामांसह कंटेन्मेंट झोन तयार करून त्या भागात सतत सर्वेक्षण करत आहेत. परंतु प्रत्यक्ष जनसामान्य आरोग्य विभागाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज कोरोनाचा कहर कमी होण्याएेवजी वाढतच आहे.
बुलडाणा तालुक्यातील चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या २१ गावांत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी असंख्य रुग्ण विलगीकरणात राहण्याऐवजी सर्रासपणे बाहेर फिरत आहेत.
याकडे महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
कोरोनाची दहशत गंभीर रूप धारण करत असताना, नागरिक मात्र बिनधास्तपणे वागत आहेत.
प्रशासनाच्या नियमांची गावागावात पायमल्ली होताना दिसत आहे. मास्क न लावणे, दररोजची होणारी गर्दी यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढतच आहे.
१ हजार ८२ जणांना लस
प्राथमिक आरोग्य केंद्र, चांडोळ याठिकाणी १७ मार्चपासून आजवर केवळ ५०७ नागरिकांनी कोविडची लस घेतली आहे, तर धाड ग्रामीण रुग्णालयात आजपर्यंत केवळ ५७६ नागरिकांनी लस घेतली.
धाड येथील लोकसंख्या साधारण २२ हजारावर आहे, तर प्रा. आ. केंद्रात येणाऱ्या २१ गावांतील लोकसंख्या साधारण ५५ हजार. परंतु आतापर्यंत केवळ १ हजार ८२ जणांनीच लस घेतली.
लसीकरणाबाबत जनजागृती
आवश्यक
कोरोना आजारावर नियंत्रण ठेवण्याऱ्या जिल्ह्याच्या अधिकारी वर्गाने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे.
दररोज कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. धाड भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आता आरोग्य उपकेंद्र असलेल्या ठिकाणी कोविडची लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरीही नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी भीती निर्माण झाली आहे. याबाबत गावागावात कोविडच्या लसीकरणाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
शासनाने सर्वच शासकीय विभागांचा सहभाग घेऊन कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करावी. कोरोनाचा कहर वाढत आहे, सर्वच विभागांचा
सहभाग घेऊन लसीकरण मोहीम राबवावी.
प्रमोद वाघुर्डे, तालुकाप्रमुख, युवासेना बुलडाणा.
नागरिकांना कोविड लसीकरणासंदर्भात भीती आणि गैरसमज याठिकाणी लसीकरणाबाबत अडचणीचे ठरत आहे.
डॉ. सोनाली शेळके, वैद्यकीय अधिकारी, चांडोळ.