Corona Deaths : बुलडाणा जिल्ह्यात दर दहा तासाला एक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:15 AM2021-03-31T11:15:53+5:302021-03-31T11:16:04+5:30
Corona in Buldhana District : साधारणत: दहा तासाला एक मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही आता वाढले आहे. गेल्या सहा दिवसात कोरोनाचे १५ बळी गेले आहेत. त्यानुसार साधारणत: दहा तासाला एक मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
जिल्ह्यात कोरोना महामारीला २८ मार्च रोजी वर्षपूर्ती झाली. पश्चिम वऱ्हाडातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू हा बुलडाण्यातील होता. त्यामुळे सुरुवातीला कोरोनाची एक भीती प्रत्येकामध्ये निर्माण झाली होती. परिणामी प्रत्येकजण मास्क वापरणे, गर्दीच्या टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात होते. मात्र हळूहळू यात बदल होत गेले. दरम्यान, कोरोनावर लस आल्यापासून अनेक नागरिक अधिकच बिनधास्त झाले. मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणे यामुळे कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोजचा एक नवा उच्चांक गाठत आहे. परंतु त्याहीपेक्षा चिंताजनक बाब ही कोरोनाने होणारे मृत्यू आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना मृत्यू होण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. आतापर्यंत पॉझिटिव्हिटीचा दरच जास्त होता, मात्र आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा दरही वाढला आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये १५ मृत्यू झाले आहेत. प्रत्येक दिवशी आता दोन ते तीन मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गंभीर स्थिती ओळखून प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
या ठिकाणी झाले मृत्यू
गेल्या सहा दिवसांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील अमोना, अमडापूर, खामगाव शहर, खामगाव तालुक्यातील गणेशपूर, मलकापूरमधील विष्णूवाडी, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा, वाशिम, नांदुरा, पुंडलीकनगर चिखली, देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सर्दी, खोकला झाला तर अंगावर काढून नका, लगेच तपासणी करून घ्या. प्राथमिक अवस्थेतच उपचार झाले तर मृत्यू ओढावू शकणार नाही. मृत्यूचे प्रमाण हे वृद्धांमध्ये जास्त असल्याने ६० वर्षांवरील व्यक्तींची काळजी घ्या. लसीकरणासाठी स्वत:हून पुढे या. प्रत्येकाने नियमांची त्रिसूत्री पाळावी.
-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा