कोरोना संसर्गाचा ‘टी-१ सी-१’ वाघालाही बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:51 AM2020-04-03T11:51:52+5:302020-04-03T11:52:59+5:30
वयात आलेल्या या वाघासाठी सुरू असलेल्या वाघिणीचा शोधही त्यामुळे लांबला आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाने सध्या संपूर्ण देशाला लॉकडाऊन केलेले असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील टी-१ सी-१ वाघालाही कोरोनो संसर्गाचा फटका बसला असून वयात आलेल्या या वाघासाठी सुरू असलेल्या वाघिणीचा शोधही त्यामुळे लांबला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले देहरादून येथील वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांचाही येथील दौरा त्यामुळे लांबला.
आतापर्यंत जवळपास तीन हजार किमी पेक्षा अधिक किमीचा प्रवास केलेल्या टीपेश्वरमधील टी-१ सी-१ या वाघाने आता ज्ञानगंगा अभयारण्य त्याचा अधिवास म्हणून निवडले आहे. त्याची रेडीओ कॉलर आयडीही आता काढण्यात आली आहे. आता पूर्ण वाढ झालेला टी-१ सी-१ या वाघाला जोडीदार शोधण्यासोबतच ज्ञानगंगा अभयारण्य त्याच्या अधिवासासाठी उपयुक्त असल्याचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीची सहा मार्च रोजी एक बैठक झाली होती. त्यात प्रत्यक्ष ज्ञानगंगा अभयारण्याची पाहणी व अधिवास क्षेत्र तपासण्यासाठी बिलाल हबीब व अन्य सदस्य २८ मार्च रोजी येणार होते. मात्र कोरोना संसर्गाच्या देशव्यापी संकटामुळे या समितीमधील सदस्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. परिणाी टी-१ सी-१ साठी जोडिदाराचा शोध घेण्याची प्रक्रियाही बाधीत झाली आहे.
३०१७ किमीचा प्रवास
टी-१ सी-१ वाघाने जवळपास गेल्या १४ महिन्यात तीन हजार १७ किमीचा प्रवास केला आहे. दरम्यान त्याच्या रेडीओ कॉलर आयडीची बॅटरी संपत आली होती. त्यातच ज्ञानगंगा अभयारण्य त्याने निवडले असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याची कॉलर आयडी रिमोटद्वारे काढण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे देहरादून येथील वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांच्यासह पाच सदस्यीय समितीचा ज्ञानगंगा अभयारण्याची पाहणी करून त्याच्या अधिवासासाठी उपाययोजना करण्यासाबेतच जोडीदाराचा शोध घेण्याची प्रक्रिया बाधीत झाली आहे. येत्या काळात यासंदर्भात बैठक होऊन बिलाल हबीब हे ज्ञानगंगा अभयारण्यास भेट देणार आहे. येथील एकंदरीत अधिवासाचीही ते पाहणी करणार आहेत.
- मनोजकुमार खैरनार,
उपवन संरक्षक, वन्यजीव विभाग अकोला.