चिखलीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:01+5:302021-02-17T04:41:01+5:30
गेल्या १५ दिवसापूर्वी शहरात कोरोनाचे फारसे रुग्ण न आढळल्याने कोरोना संसर्ग कमी झाल्याचे समजून अनेकजणांनी मास्कचा त्याग केला होता. ...
गेल्या १५ दिवसापूर्वी शहरात कोरोनाचे फारसे रुग्ण न आढळल्याने कोरोना संसर्ग कमी झाल्याचे समजून अनेकजणांनी मास्कचा त्याग केला होता. तथापि शहरात कोणत्याही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. परिणामी अचानकपणे शहरासह तालुक्यात अनेकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. चिखली शहरातील खासगी दवाखान्यात आज रोजी सुमारे ५० पेक्षा अधिक बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.सुहास तायडे यांनी दिली आहे. जिल्हा माहिती कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार १५ फेब्रुवारी रोजी शहरातील २३ तर सोमठाणा, भरोसा, देऊळगाव घुबे, कवठळ, शिरपूर, जांभोरा, शेलगाव, गोरेगाव येथे प्रत्येकी एक आणि सवणा येथे ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी यामध्ये पुन्हा भर पडली असून चिखली शहरात ११ आणि हिवरा, अमडापूर, धोत्रा भनगोजी, हातणी या गावात प्रत्येकी एक याप्रमाणे मंगळवारी १५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्वॅब नमुन्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे. दरम्यान वैद्यकीय विभागाव्दारे या बाधितांच्या संपर्कातील अनेकांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले असल्याने रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या देखील मोठी असून अनेकजण काहीच होत नाही, या भावनेतून दवाखान्यात देखील जाणे टाळत आहे. तथापि कोरोनाबाबतच्या त्रिसूत्रीचा सर्वांचा विसर पडल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
काँग्रेसची उपाययोजना करण्याची मागणी
गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झालेली वाढ पाहता त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी चिखली शहरामध्ये तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसच्यावतीने चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ व तहसीलदार येळे, मुख्याधिकारी वायकोस यांच्याकडे शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.