अनलॉकनंतर बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:00 AM2020-06-26T11:00:33+5:302020-06-26T11:00:45+5:30
केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असले तरी लॉकडाऊन काळात काही प्रमाणात आटोक्यात असलेल्या कोरोनाने लॉकडाऊन उघडताच डोके वर काढले आहे. ३० मार्च ते ३० मेपर्यंत तीन महिन्यात जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. तर केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. तेव्हापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तसेच नागरिकांमध्येही प्रचंड भीती होती. पोलिसांकडूनही चांगलाच ‘प्रसाद’ मिळत होता. त्यामुळे बाहेर गर्दी होत नव्हती. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण नियंत्रणात होते. पहिल्या लॉकडाऊननंतर दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस जिल्ह्यात प्रशासन थोडे सैल झाले. मार्च महिन्यापासून तर ३० मेपर्यंत जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. त्यानंतर लॉकडाऊन उघडण्यात आला. लॉकडाऊन उघडल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्ण वाढले असून, सध्या जिल्ह्यात १६९ रूग्ण आहेत. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात घाटाखाली मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मलकापूर तालुक्यात ६३ रूग्ण आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलकापूरात २७ मे पासून तर ३० मेपर्यंत १२ रूग्ण आढळले. त्यानंतर जून महिन्यामध्ये ५० रूग्ण आढळले. तसेच पातूर्डा गावात १७ रूग्ण आढळले आहेत.
पातुर्ड्यामध्ये पहिला रूग्ण ९ जून रोजी आढळला होता. लॉकडाऊन काळात या गावात एकही रूग्ण नव्हता.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होण्याकरिता बाहेर राज्यातून तसेच बाहेर जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरीत मजूर व नागरिकही कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात तब्बल १ लाख ३ हजार नागरिक बाहेरून आले.
घाटावरील पाच तालुके कोरोनामुक्त तर घाटाखालील एकही नाही
जिल्ह्यातील सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली व देऊळगाव राजा हे पाच तालुके कोरोना मुक्त आहे. तर घाटाखालील एकही तालुका सध्या कोरोनामुक्त नाही. घाटाखालील खामगावमध्ये १, मलकापूरमध्ये ६३, जळगाव जामोदमध्ये २, नांदुरा २, शेगाव २ तर संग्रामपूर येथे सध्या तीन अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना संसगार्मुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण घाटाखालील आहेत.
अनलॉक झाल्यानंतर रूग्ण वाढले आहेत. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. फिजीकल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन व्हायलाच हवे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे. हात वारंवार धुतल्यास कोरोनाचा धोका कमी आहे.
- डॉ. नीलेश टापरे
निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव