ग्रामीण भागात वाढतोय कोरोना, नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:50+5:302021-05-26T04:34:50+5:30
पोलीस आणि प्रशासन नियमांची अंमलबजावणी करायला सांगत असले, तरीही नागरिकांची ही बेफिकीर वृत्ती कायमच आहे. तोंडाला मास्क न बांधणे, ...
पोलीस आणि प्रशासन नियमांची अंमलबजावणी करायला सांगत असले, तरीही नागरिकांची ही बेफिकीर वृत्ती कायमच आहे. तोंडाला मास्क न बांधणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, या गोष्टी मोठ्या संकटाला निमंत्रण देणारे ठरत आहे. अगदी मनमोकळेपणाने कायदा धाब्यावर बसवत, कोरोनाला फाट्यावर मारत नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. लोणार तालुका परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक गावांत काळजी म्हणून कंटेन्मेट झोन करण्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही नागरिकांना मात्र आता भीती दिसून येत नाही. तोंडाला मास्क न लावता, दुकानांसमोर व बँकांमध्ये गर्दी होत आहे. केवळ पोलीस समोरून आले, तरच मास्क लावला जातो. प्रशासनानेही ‘ऑफ दी रेकॉर्ड’ सूट दिली असल्याने, आता नियमांचे पालन फारसे होताना दिसून येत नाही. कोणत्याही प्रकारचे काम नसताना, लोणार तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठेत नागरिकांकडून मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. बियाण्यांची दुकाने, खते खरेदी करण्याची गर्दी, दररोज किराणा, कापड, सराफा दुकानांसमोर गर्दी दिसत आहे.
काम काय आहे?
बाहेर पडणाऱ्यांना काम काय आहे, असे विचारले असता, काम काहीही नसले, तरी घरात बसून करमत नाही, असे सांगितले जात आहे. एकंदरीत या नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती वाटत नसल्याचे दिसून येत आहे. नियमांची अंमलबजावणी मात्र प्रत्यक्षात होताना दिसून येत नाही.
एकच दिवस वाटते कोरोनाची धास्ती
गाव सील केले की, एक दिवस त्याचा परिणाम गावावर जाणवतो, परंतु दुसऱ्या दिवसापासून मात्र पळवाटा शोधून गावाबाहेर जाऊन आपली फिरण्याची हौस नागरिक भागवून घेताना दिसत आहेत. काहीही काम नसले, तरी लोणारला तालुक्याच्या ठिकाणी दोन चकरा मारून गावात गेल्याशिवाय त्यांचे मन रमत नाही, असे अनेक जण गावात दिसून येत आहेत.
शारा येथे तीन रुग्ण
सोमवारी शारा येथे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. गाव सील केले, परंतु गावातील अनेक जण मात्र लोणार बाजारपेठेत दिसून येतात. हीच गत कोयाळी, पिंपखुटा, दाभा, वडगाव तेजन, धायफळ, देऊळगाव, वायसा, येवती, सोमठाणा, सुलतानपूर या गावांमध्येही पीहावयास मिळाली.