सिंदखेडराजात कोरोना वाढतोय! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:41+5:302021-04-01T04:34:41+5:30
प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी गरजेची सिंदखेडराजा : शहरात सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची स्थिती भयंकर होण्याची शक्यता आहे. ...
प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी गरजेची
सिंदखेडराजा : शहरात सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची स्थिती भयंकर होण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून कोविड नियमांचे पालन होत नसल्याने रुग्णवाढीचा वेग वाढला आहे.
गेल्या १० दिवसांत नोंदणीकृत किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या मर्यादित असली तरीही सुपर स्प्रेडर असलेल्या व्यक्ती रुग्णसंख्येत भर घालत आहेत.
पालिका प्रशासन व आरोग्य विभागाने शहरातील रस्त्यांवर व्यापार करणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली. परंतु चार दिवसांत ही मोहीम आटोपती घेण्यात आली. सध्या ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, त्याच्या शेजारील घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत.
दरम्यान, शनिवारी भाजी मंडईत कोरोना चाचणी करण्यात आली. यात अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे कोविड सेंटरकडून सांगण्यात आले आहे.
सध्या लसीकरण सुरू असल्याने तो एक सुरक्षेचा भाग मानला जात असला तरीही दुसरीकडे ३५ ते ५० वयोगटातील रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना कोविड सेंटरला राहण्याची मानसिकता नसलेले रुग्ण गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारतात. मात्र यातील काही रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचेही अनेकांनी सांगितले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण असे फिरणार असतील तर शहरात कोरोनाचा विस्फोट होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जे रुग्ण बाहेर फिरतात त्यांना रोखणे आणि सक्तीने आयसोलेशन करणे गरजेचे आहे. कोरोना नियम पाळण्यासाठी सर्वांनीच ‘माझी जबाबदारी’ समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, शहरात कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ दूर असणार नाही.
नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर जाऊ नयेे. सर्वांच्याच जबाबदार वागण्याने कोरोनावर आपण मात करू शकतो.
- डॉ. प्रवीण तायडे, कोविड सेंटर, सिंदखेडराजा.