आरटीईच्या अर्जाला कोरोनाची बाधा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:19+5:302021-02-27T04:46:19+5:30

बुलडाणा : आर. टी. ई. अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून पश्चिम विदर्भात ८ हजार १७२ जागा ...

Corona hinders RTE application? | आरटीईच्या अर्जाला कोरोनाची बाधा?

आरटीईच्या अर्जाला कोरोनाची बाधा?

Next

बुलडाणा : आर. टी. ई. अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून पश्चिम विदर्भात ८ हजार १७२ जागा भरण्यात येणार आहेत. पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास ३ मार्चचा मुहूर्त मिळाला आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जमावबंदी आदेशामुळे महा- ई- सेवा केंद्रही बंद आहेत. त्यामुळे अर्ज भरायचे कसे, हा प्रश्न आहे.त्यामुळे आरटीईच्या अर्जाला कोरोनाची बाधा निर्माण झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रिया कोरोनामुळे विस्कळीत झाली होती. सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद असल्याने पालकांना महा- ई- सेवा केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या काळात कागदपत्रे मिळविण्यासाठी पालकांना अडचणी येत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- २००९ मधील कलमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे २०२१-२२ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. अमरावती विभागामध्ये ९८२ शाळांमध्ये जवळपास ८ हजार १७१ विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३ मार्च ते २१ मार्च २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत आहे. परंतु, कोरोनाच्या काळात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांची चांगलीच अडचण निर्माण होणार आहे. आरटीईचा लाभ घेणाऱ्या पालकांची परिस्थिती हलाखीची राहत असून, ऑनलाईन् अर्ज करण्यासाठी या पालकांना महा- ई- सेवा केंद्राचाच आधार घ्यावा लागतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सेवा केंद्र बंद असल्याने पालकांना आतापासून ऑनलाईन अर्ज कसे भरायचे, याची चिंत पडली आहे.

कागदपत्रांसाठी होतेय दमछाक

कोरोनाच्या काळात आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी पालकांची दमछाक होत आहे. या प्रवेशाकरिता रहिवासाचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास), कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, विधवा महिला, अनाथ बालके आदी कागदपत्रे मिळविणे अवघड झाले आहे. अनेक पालकांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, कोरोना विषाणू संसर्गामुळे अधिकारीही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे पालक अडचणीत सापडले आहेत.

अमरावती विभागातील आरटीईच्या शाळा आणि जागा

शाळा जागा

बुलडाणा २३१ २१४२

अकोला २०२ १९६०

वाशिम १०३ ७१८

अमरावती २४४ २०७६

यवतमाळ २०२ १२७५

Web Title: Corona hinders RTE application?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.