कोरोनाचा ‘मानव विकास’ला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:03+5:302021-08-19T04:38:03+5:30
बुलडाणा : कोरोना संक्रमणामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील विकास ...
बुलडाणा : कोरोना संक्रमणामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील विकास प्रक्रियेंतर्गत येत असलेल्या कामांनाही याचा फटका बसला आहे. प्रामुख्याने या सात तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी अर्थात या तालुक्यातील आर्थिक, आरोग्य आणि शिक्षणस्तर वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत होत्या. प्रामुख्याने त्यांना यामुळे फटका बसला. थोडक्यात, एकप्रकारे मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या प्रयत्नांनाच त्यामुळे खीळ बसली आहे. २०१३ पासून राज्यात मानव विकास निर्देशांकामध्ये मागे असलेल्या १२५ तालुक्यांत प्रामुख्याने मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये या संबंधित तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिकांचा आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक स्तर वाढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली विविध योजनांचे एकत्रीकरण करून या तालुक्यातील जीवनमान उंचावण्यास प्राधान्य देण्यात येत होते. मात्र, कोरोनामुळे यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या योजनांनाच खीळ बसली. आता कोरोनाचे संक्रमण कमी व नियंत्रणात आल्यामुळे या योजनांना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या सातही तालुक्यांतील नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांनाही फटका बसला आहे. परिणामी कोरोनामुळे या उपक्रमांना नेमका काय फटका बसला याचेही मोजमाप होण्याची गरज आहे.
--मानव विकासच्या बसेस बंद--
कोरोनामुळे मधल्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे मानव विकासच्या वतीने मुला-मुलींना शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या ४९ बसेसही बंद कराव्या लागल्या होत्या. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यामुळे आता जिल्ह्यातील ४८७ शाळा सुरू झालेल्या आहेत. परिणामी या शाळांच्या मार्गावर ‘मानव विकास’च्या बसेस सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.
--अभ्यासिका, बालभवनही बंद--
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी तथा त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी ‘मानव विकास’ अंतर्गत सातही तालुक्यांत जवळपास १६४ अभ्यासिका यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. शाळा बंद असल्यामुळे त्यांचाही विद्यार्थ्यांना लाभ घेता आला नाही. सोबतच सातही तालुक्यांतील ग्रामीण भागातील सात शाळांमध्ये सात बालभवन उभारण्यात आलेले आहेत. जवळपास ७० लाख रुपयांचे साहित्य त्यासाठी २०१५ दरम्यान खरेदी करण्यात आलेले होते. दरवर्षी साधारणत: २० हजार विद्यार्थी त्यांचा लाभ घेतात. मात्र, त्यालाही कोरोनामुळे फटका बसला आहे.