बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार कोरोना रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:19 AM2020-04-11T11:19:17+5:302020-04-11T11:19:31+5:30
खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येते प्रत्येकी २० बेडचे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येते प्रत्येकी २० बेडचे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दहा एप्रिल रोजी बुलडाणा येथे दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पारपडलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य यंत्रणेवर येणारा अतिरिक्त ताण पाहता तत्काळ अतिरिक्त डॉक्टर्स, सफाई कामगारांची पदे भरण्यात येणार असून तशी हालचाल सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या लढ्यात जे आरोग्य कर्मचारी, अधिकारी सहभागी आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात औषधी, मास्क व पीपीई किट्सही उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी एकूण २५ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये मलकापूर येथून क्वारंटीन करण्यात आलेले १२ तर देऊळगाव राजा येथील १३ जणांचा समावेस आहे.