‘कोरोना’ संसर्गामुळे ओशाळली माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकऱ्यांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:00 AM2020-04-25T11:00:54+5:302020-04-25T11:03:28+5:30
तहसील प्रशासनाकडून तातडीने यंत्रणा हलविण्यात आल्यानंतर अखेर युवकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: एका दुर्धर आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे मृतदेह गावात पोहोचल्यानंतरही तब्बल चार तास पडून होता. अखेर एका रूग्णवाहिका चालकाच्या सतर्कतेमुळे महसूल प्रशासनाने मृत्यूमुखी पडलेल्या युवकावर अंत्यसंस्कार केले.
खामगाव तालुक्यातील रोहणा येथील अंकुश देशमुख नामक युवकावर गत काही दिवसांपासून बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला. कोरोना संचारबंदीत त्याचा मृतदेह गावी कसा न्यावा, असा पेच त्याच्या कुटुंबियांना पडला असतानाच, बुलडाणा येथील एका संवेदनशील रूग्णवाहिका चालकाने त्याचा मृतदेह गावात आणला. मात्र, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी गावातील एक मुस्लिम वृध्द इसम या रूग्णवाहिका चालकाच्या मदतीला धावला. दोघांनी मिळून अंकुशचा मृतदेह एका ठिकाणी ठेवला. त्यानंतर तब्बल चार तासापर्यंत हा मृतदेह गावातील एका ठिकाणी पडून होता. दरम्यान, रूग्णवाहिका चालकाने जिल्हाधिकाºयांना भ्रमण दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील प्रशासनाला माहिती देण्यात आली. तहसील प्रशासनाकडून तातडीने यंत्रणा हलविण्यात आल्यानंतर अखेर युवकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
गावकरी पळाले दूर!
जगभर कोरोना विषाणू संक्रमणाने हाहाकार माजविला आहे. भीतीच्या वातावरणामुळे रोहणा येथील नागरिकांसह मृतक अंकुशच्या नातेवाईकांनीही त्याच्या मृतदेहास स्वीकारण्यास नकार दिला. रूग्णवाहिका गावात येताच, गावातील नागरिकांनी दूर पळ काढला.
वृध्दमातेसह चिल्यापिल्यांचा टाहो!
गावातील नागरिकांची माणुसकी ओशाळल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कारासाठी मृतकाची वृध्द माता, पत्नी आणि दोन मुलांनी एकच टाहो ठोकला. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही. रूग्णवाहिका चालक, एक मुस्लिम वृध्द इसम, ग्रामसेवक तसेच महसूल प्रशासनातील कर्मचाºयांनी अंत्यसंस्कार पार पाडले.
बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचा मृतदेह स्व:खर्चाने गावी पोहोचविला. कुणीही न आल्याने शेवटी जिल्हाधिकाºयांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर तालुका प्रशासनाच्या सहकार्याने युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचून दिला. त्यावेळी गावातील एका मुस्लिम समाजाच्या वृध्दानेच केवळ मदत केली.
- पप्पू दैवत
रूग्णवाहिका चालक, बुलडाणा.